एस.टी. महामंडळास भरीव अर्थसहाय्य द्या महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स काँग्रेसची शासनाकडे मागणी, आ.अनिल पाटील यांना दिले निवेदन

Saturday, September 26, 2020

/ by Amalner Headlines
अमळनेर - 
कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर देशात सुरू केलेल्या लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या राज्यातील एस.टी. महामंडळास शासनाच्या माध्यमातून भरीव अर्थसहाय्य मिळवून देऊन कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करावा या मागणीचे निवेदन महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स काँग्रेसच्या (इंटक ) वतीने अमळनेर मतदार संघाचे आमदार अनिल पाटील यांना देण्यात आले.
       यासंदर्भात अमळनेर इंटकचे अध्यक्ष नितीन पाटील(ढेकूकर), सचिव विजय वाडेकर, कार्याध्यक्ष नितीन पाटील(वावडेकर), खजिनदार अविनाश धनगर व इतर इंटक पदाधिकाऱ्यांनी आ.अनिल पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन हे निवेदन दिले व सदर विषयावर सविस्तर चर्चा करून पाठपुरावा करण्याची विनंती केली. आ.अनिल पाटील यांनी या विषयावर शासन सकारात्मक असल्याचे सांगत आपण देखील जोमाने हा विषय मांडू असे आश्वासन दिले.
        संघटनेने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, कोरोनामुळे केंद्र सरकारने व राज्य सरकारने दि.२३ मार्च २०२० पासून एस.टी. बस सेवा बंद केल्याने दररोज २२ कोटी रुपयांचे याप्रमाणे १५३ दिवसाच्या लॉकडाऊनमध्ये ३३६६ कोटी रुपयाचे आर्थिक नुकसान झाले आहे. दि.२०
ऑगस्ट पासून आंतरजिल्हा प्रवाशी वाहतुक सुरु करण्यात आली, परंतु शासनाच्या निर्देशानुसार ५० टक्के आसन क्षमतेवर वाहतुक सुरू करण्यात आल्याने केवळ ३.८ लाख प्रवाशी वाहतुक होत आहे.त्यामुळे दररोज २० कोटी रुपयाचे एस.टी. महामंडळाचे आर्थिक नुकसान होऊन कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करणे, डिझेल खर्च व इतर खर्च भागविणे अत्यंत अवघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर महामंडळाची आर्थिक परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे. तसेच सध्या रा.प. महामंडळाचा संचित तोटा ६००० कोटीहून अधिक आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हे राज्याला उत्पन्न देणारा शासनाचा अंगिकृत उपक्रम आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने सदर परिस्थितीवर मात करण्यासाठी तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करून सर्वसामान्य जनतेला किफायशीर दरात वाहतुक व्यवस्था व दर्जेदार सेवा देण्यासाठी रा.प. महामंडळास विविध प्रकारे आर्थिक सहाय्य करणे अत्यंत गरजेचे आहे. आणि शासनाच्या आर्थिक मदतीशिवाय ते शक्य नाही, तरी शासनाकडून अर्थसहाय्य मिळवून देत कायमस्वरूपी उपाययोजना देखील केल्या जाव्यात अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
              याशिवाय काही इतर मागण्या देखील या निवेदनात करण्यात आल्या असून यात माहे जुलै २०२० व माहे ऑगस्ट २०२०या दोन महिन्याचे एस.टी. कर्मचा-यांचे वेतन तात्काळ दयावे. रा.प. महामंडळास कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबुत करण्यासंदर्भात लॉकडाऊन काळात झालेल्या आर्थिक नुकसान भरपाईपोटी ३००० कोटी रुपये अनुदान देण्यात यावे. एस.टी. कर्मचा-यांना शासकिय कर्मचा-यांप्रमाणे वेतन देण्यात यावे. एस.टी. कर्मचा-यांना शासन निर्णयाप्रमाने वार्षिक वेतनवाढीचा दर ३ टक्के व घरभाडे भत्ता देण्यात यावा यासह इतर मागण्यांचाही यात समावेश करण्यात आला आहे.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines