माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ या मोहिमेतून वाढणार आरोग्य साक्षरता-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हीडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांशी साधला संवाद जिल्ह्यातील आरोग्य सुविधांसाठी दहा कोटी रुपयांचा निधी मिळावा - पालकमंत्री गुलाबराव पाटील

Saturday, September 26, 2020

/ by Amalner Headlines
जळगाव -
‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ या मोहिमेतून प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या आरोग्याची स्थिती समजण्यास मदत होईल. या मोहिमेच्या माध्यमातून आरोग्य साक्षरता वाढवायची आहे. त्यासाठी लोकांचा सहभाग आवश्यक आहे. लोकसहभाग वाढविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (दि.२६) दुपारी नाशिक विभागातील पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्याशी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधत कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
या व्हीडिओ कॉन्फरन्समध्ये जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. प्रवीण मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन.पाटील, महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस.चव्हाण, उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, तुकाराम हुलवळे आदी सहभागी झाले होते.

   मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ या मोहिमेच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांचे आरोग्यमान कळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या मोहिमेची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. आरोग्य विभागाचे पथक प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांची तपासणी करेल असे नियोजन करावे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिक विभागाचे काम योग्य दिशेने सुरू आहे. कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी प्रत्येक नागरिकाने मास्क वापरणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना शारीरिक अंतर ठेवावे. हात नियमितपणे साबण किंवा सॅनेटायझरने स्वच्छ करावेत. या गोष्टी आता प्रत्येकाने अंगवळणी पाडून घ्याव्यात. कोरोना बाधित काही रुग्णांना गृह अलगीकरणात ठेवण्यात येते. अशा व्यक्तींवर आरोग्य प्रशासनाने लक्ष ठेवले पाहिजे. जेणेकरून कोरोनाबाधित रुग्ण घराबाहेर पडणार नाही. त्यामुळे कोरोना विषाणूच्या प्रसारास आळा बसण्यास मदत होईल. नागरिकांनीही कोरोना विषाणूची प्रारंभिक लक्षणे दिसून आली तर तात्काळ रुग्णालयात जावून तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी केले.
 
जिल्ह्यातील आरोग्य सुविधांसाठी दहा कोटी रुपयांची मागणी
             पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ या मोहिमेत जळगाव जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिक सहभागी होत असून ही मोहीम आता लोकचळवळ झाली आहे. ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ या मोहिमेमुळे कोरोना विरोधातील लढ्याला बळ मिळाले आहे.  तसेच कोरोना बाधित रुग्ण वेळेत शोधला जात असून त्यांच्यावर तात्काळ उपचार करणे शक्य झाले आहे. ग्रामपातळीवर ग्रामपंचायतीसह वेगवेगळ्या माध्यमातून ग्रामस्थांमध्ये स्थानिक बोलीभाषेतून जनजागृतीचे प्रयत्न सुरू आहेत. 
       जिल्हा प्रशासनाच्या सांघिक प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे. ती पूर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यातील महसूल, पोलीस,जिल्हा परिषद, नगरपालिका प्रशासनासह आरोग्य यंत्रणा अहोरात्र झटत आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यात रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ७९ टक्क्यांपर्यत वाढले असून मृत्यूदर २.५ % पर्यंत कमी झाला आहे. कोरोना विरोधातील लढाईत लोकसहभाग वाढविण्यासाठी पूर्वीपासून प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तालुकास्तरावर ऑक्सिजनयुक्त बेड तयार करण्यात आले आहेत. तसेच रुग्णांच्या मदतीसाठी बेड साइड असिस्टंट नियुक्त करण्यात आले आहेत. हा जिल्ह्यातील अभिनव उपक्रम आहे. त्याचे सकारात्मक परिणाम पाहावयास मिळत असून नागरिकांच्या तक्रारी कमी झाल्या आहेत. स्वॅब तपासणीचे अहवाल वेळेत उपलब्ध होवू लागले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बळकटीकरणासह आरोग्य विभागाच्या बळकटीकरणासाठी दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणीही पालकमंत्री श्री. पाटील यांनी केली.
           जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी सांगितले की, ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ या मोहिमेचे पालकमंत्री महोदयांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले आहे. या मोहिमेच्या माध्यमातून आरोग्य तपासणीसाठी ३ हजारापेक्षा अधिक पथके गठित करण्यात आली आहेत. त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी १५४ पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. या मोहिमेतंर्गत जिल्ह्यात आतापर्यंत  ८५९  बाधित रूग्ण शोधण्यात यश आले आहे. ऑडिओ, व्हीडिओ जिंगल्सच्या माध्यमातून जनजागृती सुरू आहे. गेल्या दोन आठवड्यापासून रुग्ण पॉझिटिव्हीटीचा दर कमी झाला असून मृत्यूदरही कमी झाला आहे. तो अजून कमी करण्यासाठी नियोजन करण्यात असल्याची माहितीही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी यावेळी दिली.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines