व्यापाऱ्यावरील गोळीबार प्रकरणातील खरे आरोपी अखेर जेरबंद व्यापारी व पोलिस विचार विनीमय सभेचे आयोजन


अमळनेर - 
शहरातील न्यु प्लॉट परिसरात लुटीच्या उद्देशाने झालेल्या व्यापाऱ्यावरील गोळीबार प्रकरणातील ख-या आरोपींना पकडण्यात अमळनेर  पोलिसांना अखेर यश आले आहे. अत्यंत जलद गतीने तपास करून पोलीसांनी आरोपींना जेरबंद केले आहे. 
आरोपी अवघे विशीतील
या प्रकरणातील दोन्हीही आरोपी      अवघ्या १९ ते २० या वयोगटातील आहेत. झटपट पैसा कमावण्याच्या नादात आरोपींनी  गोळीबारासारखा गुन्हा करून व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रयत्न केला.  माहितगार व्यक्तीचा गुन्ह्यात सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आधीपासूनच  होता. म्हणूनच त्या दिशेने तपास करून आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.
              शहरातील व्यापारी बसंतलाल बितराई  व अजय बितराई यांच्यावर दि.३ फेब्रुवारी रोजी रात्री पावणे अकरा वाजता  दोन अज्ञात तरुणांनी तोंडाला रुमाल बांधून गोळीबार केला होता. या घटनेने अमळनेर शहरात आणि व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली होती. जळगावचे पोलिस अधीक्षक आणि अप्पर पोलिस अधीक्षक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. तसेच आरोपींचा कसून शोध घेण्याचे आदेश पोलीसांना दिले होते. त्यामुळे या आरोपींना अटक करणे हे पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले होते.
पोलिसांची दिशाभूल करून जळगावच्या दोघांना गोवण्याचा  प्रयत्न
   या प्रकरणात एकाने पोलीसांची दिशाभूल करून जळगाव येथील दोन तरुणांचा बदला घेण्यासाठी बनावट जामीन अर्ज दाखल केला होता. त्यामुळे पोलिसांनी या दोघा तरुणांना ताब्यात घेतले होते. चौकशीत ते आरोपी असल्याचे स्पष्ट झाले.
मात्र पोलिसांनी पर्यायी यंत्रणा कामाला लावून गोपनीय माहिती  काढली असता बितराई यांच्या कैलास ट्रेडिंगच्या आजूबाजूला फिरणारे आरोपी असल्याची माहिती मिळाली होती.
 आरोपींना अशी केली अटक
         पोलिसांनी आपली तपास यंत्रणा कामाला लावून आरोपींचा माग काढला. त्यात बितराई यांच्या कैलास ट्रेडिंगच्या आजूबाजूला फिरणारे आरोपी असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक अंबादास मोरे , हेडकॉन्स्टेबल बापू साळुंखे , पोलीस नाईक शरद पाटील , पोलीस नाईक दीपक माळी , रवी पाटील व हितेश चिंचोरे यांनी निखिल कैलास पाटील ( वय १९ रा. लासुर गल्ली , मांडळ) याला ढेकू रोडवरील दीपकनगर येथून अटक केली. तर योगेश श्याम दाभाडे ( वय २० रा. पारधीवाडा गांधलीपुरा) याला त्याच्या राहत्या घरून अटक केली. त्यात पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार योगेश हा सहा महिन्यांपूर्वी कैलास ट्रेडिंग कंपनी दुकानाच्या शेजारील हितेश ट्रेडिंग या दुकानात कामाला होता. तो काम सोडून बदलापूर ठाणे येथे गेला होता. जानेवारी महिन्यात तो परत आला होता. त्याने मध्यप्रदेशातील एका गावठी पिस्तुल वाल्याला बोलावून त्याच्याकडून गावठी पिस्तुल घेतली होती . गेल्या एक महिन्यापासून तो आणि निखिल याने कैलास ट्रेडिंगच्या आजूबाजूला पाळत ठेवली होती.  आणि संधी साधत ३ फेब्रुवारी रोजीच्या रात्री हल्ला करून लुटण्याचा प्रयत्न केला होता. निखिल हा १२ वीचा विद्यार्थी असल्याचे समजते. दि.९ रोजी संध्याकाळी सव्वा पाच वाजता पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. आरोपी मिळाल्याची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे  पोलीस निरीक्षक बी.जे.रोहम यांनी अमळनेर येथे येऊन  आरोपींची चौकशी व गुन्ह्यातील काही माहिती संकलन केली.
       या प्रकरणातील निखिल नावाचा आरोपी हा घटनेच्या आधी अगदी १५ दिवसापासून कीर्तन करीत असल्याची माहिती मिळाली आहे. आपल्यावर कोणीही संशय घेऊ नये यासाठी किर्तनाचा मार्ग त्याने निवडला असावा असे वाटते. पण त्याचा हा प्रयत्न असफल ठरला.  पोलिसांच्या शोध कार्याचे सर्वत्र  कौतुक केले जात आहे. 
व्यापारी - पोलीस विचार विनीमय सभा संपन्न
  या घटनेच्या पार्श्वभूमीवर  शहरातील  व्यापारी बांधव व पोलीस प्रशासन यांची विचार विनीमय सभा आज दि.१० फेब्रुवारी रोजी रात्री 9 वाजता सुजान मंगल कार्यालय येथे घेण्यात आली होती. किराणा दुकानदार असोशियनच्या वतीने या सभेचे आयोजन करण्यात आले होते. व्यापारी बांधवांनी कोणत्या प्रकारची सुरक्षितता बाळगली पाहिजे या संदर्भात पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी मार्गदर्शन केले. व्यापा-यांनी   उपस्थित केलेल्या प्रश्नांवरही  उपयुक्त माहिती देण्यात आली.
------------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.