-------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------
येथील पोलीस परेड ग्राउण्डवर पोलीस कर्मचा-यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमदार अनिल भाईदास पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन गोरे,आरोग्य विषयक तज्ञ डॉ.अविनाश जोशी हे उपस्थित होते. पोलिस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक डॉ. शरद पाटील यांनी या उपक्रमाचे नियोजन केले होते. 

पोलिस दलाचे उत्कृष्ठ कार्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊन जाहीर केल्यापासून शहरात पोलीस विभागाने अल्प कर्मचारी संख्या असतांनाही अंमलबजावणीत उणीव भासू दिली नाही. तालुक्यात कोरोना बाधित रूग्ण आढळून आल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लोकप्रतिनिधी व प्रशासनाने जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन केले होते. या कालावधीत पोलीस दलाने उत्कृष्ठ कार्य केले आहे. आपले सर्वांचेच योगदान फारच मोलाचे ठरले आहे.आपण कोरोना युद्धातील योद्धा आहात असे आ.अनिल पाटील यांनी सांगितले. यापुढेही आपण सर्व शक्तीसह कार्यरत रहाणार आहेत. आपण आपली स्वतःची व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.

सकारात्मक रहा,सावध रहा
डॉ.अविनाश जोशी यांनी आरोग्य विषयक महत्वाचे मार्गदर्शन केले. आपणही कामावर असतांना शक्य तितके सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे. मास्क किंवा रूमालाचा वापर करावा. सॅनिटायजर अथवा साबण लाऊन हात स्वच्छ धुवून घ्यावेत.आरोग्य विभागाने दिलेल्या सुचनांचे आपण पालन करावे. आयुष मंत्रालयाने सुचवलेला काढा व गोळया यांचे सेवन करावे. नेहमी सकारात्मक विचार करावा.आपला पॉझिटीव्ह विचार कोरोनाला निगेटीव्ह करणार आहे. घाबरू नका पण सावध रहा,तब्येतीची काळजी घ्या. आपल्या परिवाराची देखील काळजी घ्यावी असे डॉ.जोशी यांनी सांगितले.
कोरोना रोखण्यात यंत्रणेला पूरक काम
अप्पर पोलिस अधीक्षक सचिन गोरे यांनी पोलीस कर्मचारी हा देखील या युद्धातील महत्वाचा घटक आहे. कोरोनाला रोखण्या साठी इतर शासकीय यंत्रणेला पूरक असे महत्वाचे काम पोलीस कर्मचारी करत आहेत. आपण सक्षमपणे हे काम पूर्ण करू.
त्यासाठी आपले आरोग्य चांगले राहील याची काळजी आपण घ्यावी असे अप्पर पोलीस अधिक्षक सचिन गोरे यांनी सांगितले. 

लोकप्रतिनिधी,अधिकारी व डॉक्टरांनी केलेले मार्गदर्शन पोलीस कर्मचा-यांचे मनोबल वाढविणारे ठरले. पोलिस निरीक्षक अंबादास मोरे यांनीही मार्गदर्शन केले.यावेळी सपोनि प्रकाश सदगीर,सपोनि एकनाथ ढोबळे,पोउनि राजेंद्र माळी,पोउनि सुर्यवंशी,पोना दिपक माळी,रवि पाटील,हितेश चिंचोरे,हजेरी मास्टर संजय पाटील,क्राईम रायटर भटूसिंग तोमर,दिपक विसावे,सुनिल हटकर,पुनम हटकर आदींसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
No comments
Post a Comment