---------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
अमळनेर - कोरोनाचे संकट आपल्या अतिशय जवळ येऊन पोहोचले आहे.अन्य देशातील परिस्थिती पहाता आपणास खुपच काळजी घ्यावी लागणार आहे. कोरोना विषयक सातत्याने माहिती देणे माझे कर्तव्य आहे , मी सर्वाना काळजीपोटीच आपल्याला या सुचना देत आहे. आपण आता अगदी निर्णायक टप्प्यावर आलो आहोत. आपण कोरोनाचा प्रादुर्भाव जर आत्ताच रोखला नाही तर जगात होते आहे तसे थैमान आपल्या देशातही होऊ शकते. त्यामुळे जनतेच्या हितासाठी काही कठोर निर्णय घेतले जातील अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. त्याचप्रमाणे आजपासून राज्यात संचारबंदी लागू करण्यात येत आहे असेही ना.ठाकरे म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार सर्वांनी जनता कर्फ्यु यशस्वी केला त्याबद्दल मी जनतेला धन्यवाद दिलेले आहेत. सर्वांनी जनता कर्फ्यू चांगला पाळला. थाळ्या, घंटा वाजविल्या पण हे सगळे कोरोनाला घालविण्यासाठी नव्हते.तर वैद्यकीय क्षेत्रात सतत काम करीत राहणाऱ्या अधिकारी, कर्मचारी वर्गासाठी होते. काल राज्यात १४४ कलम लावले होते आज मला राज्यात संचारबंदी लागू करावी लागत आहे. या संचारबंदीचे नागरिकांनी पालन करावे .
राज्यात खासगी वाहने अत्यावश्यक व महत्त्वाचे कारण असेल तरच सुरु राहतील. रिक्षा, टॅक्सी यामधील प्रवाशांची संख्या मर्यादित असेल. आवश्यकता नसेल तर घराबाहेर निघणे व प्रवास टाळावा.काल शेजारील इतर राज्याच्या सीमा बंद केल्या होत्या आज आपण राज्यातील जिल्ह्यांच्या सीमा देखील बंद करीत आहोत. या वाहतूक बंदीत खासगी वाहने देखील समाविष्ट असतील. तसेच देशांतर्गत विमानतळ तत्काळ बंद करण्याची विनंती पंतप्रधानांना केलेली आहे.जीवनावश्यक वस्तू, औषधे,अन्न धान्य तसेच त्यांची ने आण करणारी वाहने सुरु राहतील. पशू खाद्य पुरेश्या प्रमाणात मिळेल, पशूंचे दवाखानेही उघडे राहतील. कृषीमालाशी सबंधित वाहतूक सुरु राहील. राज्यातील जनतेला आपल्या घरात थांबण्याबाबत वारंवार व खुपदा विनंती करूनही पालन होत नसल्याने मला संचारबंदीचा निर्णय नाईलाजाने घ्यावा लागत आहे असेही ना. ठाकरे म्हणाले.
अधिक गर्दीचे ठिकाण असलेले सर्व धर्मीयांची प्रार्थना स्थळे दर्शनासाठी पूर्णपणे बंद राहतील.आगामी परिस्थितीचा अंदाज घेऊन त्यास सामोरे जाण्यासाठी प्रसंगी आशा वर्कर्स , अंगणवाडी सेविका, होमगार्ड्स यांना देखील वैद्यकीय बाबतीत प्रशिक्षण देऊन तयार करीत आहोत. या आजाराची व्याप्ती पहाता आज ज्यांना प्रादुर्भाव झालेला नाही असे वाटते त्यांनी देखील काळजी घेणे खूप आवश्यक आहे. घरी विलगीकरण केलेल्यांनी सरकारच्या व तज्ञ डॉक्टरांच्या सूचना नक्की पाळायच्या आहेत.जनतेने सुचनांचे पालन केले तर आधारावर नियंत्रण मिळवणे शक्य होईल. त्यादृष्टीने शासन कार्यवाही करत आहे.संचारबंदी हे कठोर पाऊल केवळ जनतेच्या हितासाठीच आहे याचा पुनरूच्चार ना.ठाकरे यांनी केला.तसेच राज्यातील प्रसार माध्यमांनी जनतेत कोरोना बाबत सकारात्मक जनजागृती केली आहे याबद्दल त्यांनी माध्यमांचे आभार मानले.
No comments
Post a Comment