अमळनेर शहर व तालुक्यात "जनता कर्फ्यू" ला उस्फुर्त प्रतिसाद - जनतेने स्वयंस्फुर्तीने केले नियमांचे पालन सायंकाळी टाळी,घंटी,थाळी वाजवून प्रशासनाचे मानले आभार

Sunday, March 22, 2020

/ by Amalner Headlines
अमळनेर-
संपूर्ण जगासमोर आव्हान बनलेल्या कोरोना व्हायरसचा भारतातील प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व देशवासियांना जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन केले होते. सर्व देशाने या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अमळनेर शहर व तालुक्यात नागरिकांनी बंद पाळून कोरोना विरोधातील लढाईत देश एक असल्याचा संदेश दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशबांधवांना केलेल्या आवाहनानुसार सायंकाळी ५ वाजता नागरिकांनी परिवारासह आपल्या घराच्या बाहेर येऊन टाळी,थाळी व घंटी वाजवून आपल्या सेवेत असलेल्या प्रशासकीय यंत्रणेतील कर्मचारी व इतर घटकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. 
           कोरोना या विषाणूच्या संसर्गाचा एकजुटीने व एक दिलाने सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार जनता कर्फ्यूला रविवारी सकाळी सुरुवात झाली.शहरातील  रेल्वेटेशन,बस स्टँड,टॅक्सी व रिक्षा स्टॅंडचा परिसर सामसूम होता. भाजीपाला मार्केट, धान्य मार्केट व अन्य लहान-मोठ्या व्यावसायिकांनी जनता कर्फ्यू मध्ये १००% सहभाग दिला होता.शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही कर्फ्यु यशस्वी झाला होता.
अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये, दुकाने, बाजारपेठा पूर्णपणे बंद होत्या. अमळनेर शहरातील व ग्रामीण भागातील लोकांनी घराबाहेर पडण्याचे टाळले. रविवारी सकाळी सात वाजल्यापासून तर रात्री नऊ वाजेपर्यंत जनतेची संचारबंदी स्वयंस्फुर्त असेल असे सांगण्यात आले होते. परंतु याला जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
विषाणू संसर्गाची रोखली साखळी
     विषाणूचा संसर्ग एकमेकांच्या जवळ जाण्याने होत असल्यामुळेच जनतेने गर्दी करू नये.आजारी रूग्णाच्या जवळ जाऊ नये आणि सर्वांनी आपापल्या घरीच थांबावे यासाठी पंतप्रधानांनी जनता कर्फ्युची कल्पना मांडली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही कल्पना नागरिकांनी अक्षरशः उचलून धरली होती. इतरवेळी प्रचंड गर्दी व रहदारीचा रस्ता व परिसर आज निर्मनुष्य दिसून येत होता.
अधिकारी वर्गाचे नियोजन

जळगाव जिल्हयाचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे,उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र ससाणे,पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, पं.स.चे गटविकास अधिकारी संदीप वायाळ,तहसिलदार मिलिंदकुमार वाघ,नपाचे मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड, उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.गोसावी यांनी आपल्या विभागाच्या सहका-यांसह कामाचे नियोजन केले होते.कर्फ्यु काळात परिस्थिती सुरळीत रहावी यासाठी पोलीस कर्मचारी,नपाचे स्वच्छता मोहिमेतील कर्मचारी,आरोग्य विभागातील डॉक्टर्स,आरोग्य सेवक,आरोग्य सेविका,आशा 
स्वयंसेविका,अंगणवाडीसेविका,विज वितरण कंपनीचे कर्मचारी,एस. टी. महामंडळाचे कर्मचारी व पत्रकार बांधवांनी विशेष परिश्रम घेतले.
 
नागरिकांनी मानले आभार
    कोरोना विरोधात लढणाऱ्या आरोग्य कर्मचारी, प्रशासकीय यंत्रणा,पोलिस प्रशासन आणि महाराष्ट्र शासन, केंद्र शासनाच्या प्रयत्नांचे नागरिकांनी सायंकाळी ५ वाजता आपापल्या घराबाहेर येऊन थाळी,टाळी व घंटी यांचा नाद करून करण्यात आले.  अमळनेर शहरात संध्याकाळी पाच वाजता एकच नाद ऐकू येत होता.अनेकांनी शासन व प्रशासन यांचे मनापासून आभार व्यक्त केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पकतेचेही देशवासियांना अप्रुप वाटले.आपल्या सामुहिक कृतीतून देश एक असल्याचे संदेश दिला आहे अशी भावना नागरिक व्यक्त करीत होते.

तहसिलदार मिलिंदकुमार यांचे आवाहन
     आजचा "जनता कर्फ्यु" उद्या दि.२३ मार्च २०२० पहाटे ५ वाजे पर्यंत सुरू राहणार आहे. दि.२३ मार्च रोजी पहाटे ५ वाजे पासून नगरपरिषद व नगरपंचायत (नागरी भागात) क्षेत्रात कलम  १४४ लागू होणार आहे.
जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्देशानुसार त्याअनुषंगाने तालुक्यातील सर्वे गावांमध्ये कोतवाल यांचे मार्फत दवंडी द्यावी. सर्व तलाठी,ग्रामसेवक, पोलीस पाटील,आशा वर्कर यांनी  आपल्या नेमणुकीच्या गावात प्रसिद्धी द्यावी असे आवाहन तहसिलदार मिलिंदकुमार वाघ  यांनी केले आहे.
----------------------------------------------------------------------------------
ओम टी पान मसाला च्या नविन दालन


No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines