----------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------
अमळनेर - आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासियांना केलेल्या आवाहनास प्रतिसाद देण्याचा निश्चय करून आज रात्री ९ वाजता घरातील सर्व लाईटस् बंद करून आपापल्या घराबाहेर येऊन दिवे,मेणबत्ती,बॅटरी लावून आपले अंगण प्रकाशात उजळण्याचा निर्धार अमळनेरकरांनी केला आहे. कोरोना व्हायरसचा प्रभाव रोखण्यासाठी शासन विविध उपाय योजना करत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि.२२ मार्च रोजी नागरिकांना जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन केले होते. त्यास जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यानंतर लॉकडाऊन व संचारबंदीच्या निर्णयाचे देशभक्त नागरिकांनी स्वागत केले. काही अपवाद वगळता सर्व नागरिकांनी नियमांचे पालन केले. या आजाराच्या निमित्ताने क्वारेंटाईन(विलगीकरण), सोशल डिस्टन्सींग हे नवे शब्द जनतेच्या चांगलेच परिचयाचे झाले. जनता कर्फ्युच्या दिवशी सायंकाळी ५ वाजता घंटानाद,थाळीनाद करून किंवा टाळ्या वाजवून आपल्या सेवेत असलेल्या प्रशासकीय यंत्रणेतील कर्मचारी व इतर घटकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा उपक्रम अलौकिक ठरला.सकारात्मक प्रयत्नातून मिळालेल्या उर्जेतून कोरोना आजाराचा मुकाबला करण्याची ताकद देशवासियांमध्ये निर्माण झाली. त्यामुळे इतर देशांच्या तुलनेत आपण नक्कीच सुरक्षित आहोत.

आज दीपप्रज्वलन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रात्री ९ वाजता आपल्या घरातील लाईटस् बंद करून आपापल्या घराबाहेर अंगणात दिवे लावावेत. ९ वाजेपासून ते ९ :०९ मिनिटापर्यंत घरातील केवळ दिवे बंद ठेवावेत असे आवाहन केले आहे. या आवाहनास देखील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणार असल्याचे दिसून येत आहे. समाजाच्या सर्वच घटकात या उपक्रमाची सकारात्मक चर्चा होत आहे. साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर मनामध्ये निर्माण झालेला अंध:कार दुर करून समाज जीवन प्रकाशित करण्याचा हा एक प्रयत्न आहे.
आज रात्री ९ वाजता
आपण काय करायचं ....!
✳️ आज रात्री ९ वाजता आपल्या घरातील केवळ लाईटस् बंद करून आपापल्या घराबाहेर अंगणात,गॅलरीत येऊन जास्तीत जास्त ९ दिवे,मेणबत्ती लावावेत.
बॅटरी,मोबाईल फोनचा लाईट लावला तरी चालेल. ही कृती आपणास ९ मिनिटे म्हणजे ९ वाजेपासून ९:०९ मिनिटांपर्यंत करायची आहे.
✳️ आपल्या घरातील फ्रीज,कुलर या वस्तू सुरू व वापरात असतील तर त्या सुरूच ठेवाव्यात. आपण घरातील सर्व मंडळी घराबाहेर आल्यावर कुलर,टीव्ही सुरू नसतीलच अशी खात्री आहेच.
✳️ या नऊ मिनिटे आपण आपापल्या अंगण,गॅलरीत असणार आहोत. सोशल डिस्टन्सींगचा नियम या कालावधीतही पालन करणे आवश्यक आहे. या वेळेत घराच्या शेजारील,परिसरातील नागरिकांनी हा उपक्रम उत्सवासारखा साजरा करू नये याची सर्वांनी काळजी घ्यावी.
✳️ या नऊ मिनिटाच्या कालावधीत या साथीच्या आजाराच्या काळात आपल्या सेवेसाठी व सुरक्षेसाठी कार्यरत असलेले डॉक्टर्स व इतर कर्मचारी,महसूल,सुरक्षा दल,पोलीस,नगर पालिका,पंचायत समिती,विज कंपनी,जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे घटक या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी.आपली इष्ट देवता,नवग्रह यांचे स्मरण करावे व नतमस्तक व्हावे.
✳️ कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने निर्धारित केलेले नियम पाळण्याचा व यापुढील काळात या प्रकारचा आजार निर्माण होणार नाही असे सदाचारी वर्तन करण्याचा कुटुंबातील सर्वांनी निर्धार करावा.
✳️ या कालावधीत आपणास आलेला अनुभव आपल्या मित्र परिवारात व नातेवाईकांत नक्कीच शेअर करावा.आपण फोटो काढणार आहेतच.
आपल्या देशाच्या प्रमुखाने जनतेला केलेले आवाहन आणि जनतेने दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद याची जागतिक पातळीवर निश्चितच नोंद होणार आहे. आपल्या देशाचा मान आणि शान वाढविणारी ही घटना ठरणार आहे.

सिंधी कॉलनीत मेणबत्ती वाटप

येथील भाजपाचे शाखा अध्यक्ष व भारतीय सिंधु सभेचे युवा अध्यक्ष संजय बितराई यांनी या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले. तसेच त्यांच्या हस्ते कॉलनीतील नागरिकांना घरोघरी जाऊन मेणबत्ती वाटप करण्यात आले.त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.याप्रसंगी गोपालदास बठेजा,जितेंद्र डिंगराई,महेश डिंगराई,अजितसिंग लुल्ला, शंकर बठेजा,नानीकराम पंजवाणी, घनश्याम थदानी, पप्पू सोनार, विजय पंजवाणी व जिजाबराव पाटील आदींची उपस्थिती होती.
सिंधी कॉलनीत लॉकडाऊनची अंमलबजावणी
शासनाने जाहीर केलेल्या आदेशानुसार सिंधी समाज बांधवांनी चोपडा रोड वरील सिंधी कॉलनी येथे लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू केलेली आहे. प्रमुख तीन मार्गावर बांबूचे कठडे बांधण्यात आले आहेत. महत्वाचे काम असल्याशिवाय कुणीही बाहेर जाऊ नये अशा सुचना देण्यात आल्या आहेत. कॉलनी बाहेर जाणारा एकच मार्ग खुला ठेवण्यात आला आहे. सिंधी समाज बांधव लॉकडाऊनची अंमलबजावणी करत आहेत.
-----------------------------------------------------------------------------



ओम टी पान मसाला च्या नविन दालन


