नरडाणे - अमळनेर रस्त्यावर १८ लाख ५६ हजारांचा गुटखा जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई - मारवड पोलीसात गुन्हा दाखल

Friday, February 26, 2021

/ by Amalner Headlines

पोलीसांच्या धडक कारवाईने गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ
--------------------------------------------------------------
               - * जाहीरात * -
---------------------------------------------------------------------
अमळनेर - नरडाणे ते अमळनेर रस्त्यावर तालुक्यातील भरवस गावाजवळ गुटखा वाहतूक करणा-या गाडीवर जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी छापा टाकत १८ लाख ५६ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मारवड पोलीस स्टेशनला सदर घटनेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलीस कारवाईमुळे गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की,धुळे जिल्ह्यातून अमळनेरकडे गुटखा वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती जिल्हा गुन्हे शाखेस मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे सापळा लावला असता नरडाणेहून अमळनेरकडे येणा-या रस्त्यावर भरवस गावाजवळ काल दुपारी १२:३० ते १ वाजेच्या सुमारास एमएच १८ बीजी ३७३८ या क्रमांकाची टाटा मॅक्स गाडी जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने थांबवली व चौकशी केली असता त्यात विमल कंपनीचा गुटखा,व्ही.एन.तंबाखू असल्याचे आढळून आले. यावेळी केलेल्या तपासणीत ४ लाख ८४ हजार रुपये किंमतीच्या २० मोठ्या गोण्या व १३ लाख ७२ हजार ८०० रुपये किंमतीच्या ६० लहान गोण्या असा एकूण १८ लाख ५६ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल व मालवाहू वाहन जप्त करण्यात आले आहे. सदर वाहन गोविंद अमरलाल राजानी रा.शिंदखेडा,जि.धुळे यांच्या मालकीचे असल्याचे समजते. अमळनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव व मारवड पोलीस स्टेशनचे सपोनि राहुल फुला यांनी घटनास्थळी भेट दिली.
सदर घटनेबाबत मारवड पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून वाहन चालक अरूण शंकर पाटील (वय५८) रा.लक्ष्मीकांत काॅलनी दोंडाईचा यांच्या विरोधात मारवड पोलीस ठाण्यात पो.कॉ.दिपक शिंदे यांच्या फिर्यादीवरून भादंवि कलम ३२८,१८८,२७२,२७३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यात अजूनही मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री होत असल्याचे या पोलीस कारवाईने स्पष्ट झाले आहे.पण या बेधडक कारवाईमुळे गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
----------------------------------------------------------------------

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines