--------------------------------------------------------------
अमळनेर - शहरात सध्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. नुकतेच परवा शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या बस स्टॅंड शेजारील वस्तीत चोरीची घटना घडली आहे. तर घरे,दुकाने यात चोरी व वाहने चोरीच्या घटनाही वाढल्या आहेत. यांना आळा घालण्यासाठी स्थानिक रहिवाशांनी सुरक्षितता पाळणे आवश्यक आहे. तसेच सिंधी कॉलनी व गावाबाहेरील वसाहतीमध्ये अधिक पेट्रोलिंगची आवश्यकता असल्याचे दिसून येत आहे.
चोरीच्या घटना - जनतेत भिती
काही दिवसांपूर्वी शहरातील जी.एस.हायस्कूल जवळील अपार्टमेंट मधील एका शिक्षकाच्या घरी चोरीची घटना घडली. तर त्या आधी शहरातील सिंधी कॉलनीतही किरकोळ चोरीची घटना घडली होती. तसेच दुचाकी वाहने चोरून नेण्याचे प्रकारही घडत आहेतच. या प्रकारामुळे जनतेतही भितीपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

सीसीटीव्हीशिवाय पेट्रोलिंग नाही का❓
मागील आठवड्यात शहराबाहेरील सिंधी कॉलनीत पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या उपस्थितीत कॉर्नर सभा घेण्यात आली. यावेळी नागरिकांनी सिंधी कॉलनीत रात्रीच्या वेळी पोलीसांनी अधिक पेट्रोलिंग करावे अशी मागणी केली होती. पण त्यानंतरही पेट्रोलिंग सुरू झाली नाही. त्याबाबत विचारले असता सीसीटीव्ही कॅमेरे लावा मग पेट्रोलिंग सुरू करण्यात येईल असे सांगण्यात आले. सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठीचा निधी स्थानिक रहिवाशी जमा करीत आहेत. त्यानंतर सीसीटीव्ही लावण्यात येतील.मग तोपर्यंत पेट्रोलिंग सुरू होणारच नाही का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नागरिकांची सुरक्षा व गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा यासाठी पोलीस पेट्रोलिंग गरजेची आहे. पोलीस कर्मचारी संख्या कमी आहे ही वस्तुस्थिती असली तरी त्यातूनच नियोजन करावे लागणार आहे. शहराबाहेरील वसाहतींना तो एक आधार असतो. तरी पेट्रोलिंग सुरू करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.
No comments
Post a Comment