--------------------------------------------------------------------
अमळनेर - घराच्या मागील दरवाजाची कडी तोडून विधवा महिलेच्या घरातून आठ लाख रूपयांचे दागिने व रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना दि.२८ जुलै रोजी रात्री ९ ते १२ वाजेदरम्यान घडली. सदर घटनेप्रकरणी अमळनेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय गेले घरफोडीत
येथील रेखा अनिल लांडगे ही महिला दि. २८ रोजी रात्री ९ वाजता घराला कुलूप लावून आपल्या मुलांसह गावातीलच बहादरपूर रोडवरील खळेश्वर मंदिराजवळील कंजरवाड्यात हळदीच्या कार्यक्रमाला गेली होती. रात्री १२ वाजेच्या सुमारास परत आल्यावर तिने घराचा दरवाजा उघडला असता तिला घराचा मागील दरवाजा तुटलेला दिसून आला. त्यानंतर घरातील कपाट पाहिल्यावर त्याचे लॉकरही तोडलेले दिसून आले. कपाटात ठेवलेले २ लाख ४० हजार रुपये किमतीचे ६ तोळ्यांचे तीन सोन्याचे नेकलेस, १ लाख २० हजार रुपये किमतीचे ३ तोळ्यांचे तीन सोन्याचे काप, २४ हजार रुपये किमतीचे ६ ग्राम वजनाचे सोन्याचे टोंगल, ८० हजार रुपये किमतीच्या २० ग्रॅम वजनाच्या ४ सोन्याच्या अंगठ्या, ८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातले किल्लू व बाळ्या, ४० हजार रुपये किमतीचे १० ग्रॅम वजनाचे मणी मंगळसूत्र, २० हजार रुपये किमतीचे पेंडल व मणी, ७ हजार ५०० रुपये वजनाचे १५ भार वजनाचे चांदीचे पैंजण, ५ हजार रुपयांचा १० भार चांदीचा कंबरेचा पट्टा व कपाटातील २ लाख ५० हजार रुपये रोख असा एकूण ७ लाखांची ९४ हजार ५०० रुपयांचा माल चोरून नेला आहे.

अधिका-यांची घटनास्थळी भेट - गुन्हा दाखल
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी, दीपक माळी, रवी पाटील यांनी भेट दिली तर श्वानपथक व अंगुली मुद्रापथक पाचारण करण्यात आले होते. श्वान पथकाचे विनोद चव्हाण यांनी श्वानाला वस्तूंचा गंध दिला तर अंगुली मुद्राचे सहायक पोलीस निरीक्षक जी. के. कांबळे, साहेबराव चौधरी यांनी विविध वस्तू व कपाटावरील ठसे घेतले.
रेखा लांडगे यांच्या पतीचे सुमारे ५ महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. महिलेच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने श्रावण श्याम संदानशीव व बंटी उर्फ विशाल नाना बिऱ्हाडे यांच्यावर संशय व्यक्त केला आहे. गुन्ह्यांचा तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल लबडे करीत आहेत.
No comments
Post a Comment