अमळनेर हेडलाइन्स न्युज रविवार स्पेशल "कव्हर स्टोरी" प्रेरणादायी कथा "ती" च्या भरारीची सामान्य कुटुंबातील "निलम" ने कठीण परिस्थितीवर मात करीत गाठले यश अत्यंत परिश्रमातून साकारले शासकीय नोकरीचे स्वप्न आर.टी.ओ. कार्यालयात अधिकारीपदी निवड झालेल्या निलम सैनानीचा जीवन प्रवास

Sunday, March 15, 2020

/ by Amalner Headlines
- * जाहीरात * -
----------------------------------------------------------
अमळनेर -
माझ्या कुटूंबाची आर्थिक परिस्थिती अतिशय सामान्य असली तरी मुलांनी शिक्षण घेतलेच पाहिजे असा माझ्या आई- वडीलांचा आग्रह होता. मुलींनी शिकून स्वावलंबी व्हावे,शासकीय अधिकारी बनावे ही त्यांची इच्छा होती.ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मी परिश्रम घेतले. आई- वडीलांची इच्छा पूर्ण होणार असल्याचे मला सर्वाधिक समाधान आहे असे भावपूर्ण उद्गार निलम सैनानी हिने काढले.

अमळनेर सारख्या शहरी व ग्रामीण वातावरण असलेल्या गावातील अतिशय सामान्य कुटुंबातील सिंधी समाजातील मुलगी कु.निलम किशोरकुमार सैनानी या युवतीची नुकतीच उपप्रादेशिक वाहतूक कार्यालय जळगाव येथे उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. सध्या प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून निलम कार्यरत आहे. तिचा जीवन प्रवास जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.

      निलमचे वडील किशोरकुमार रतनदास सैनानी हे किराणा दुकानावर काम करतात तर आई सौ.निता या शिवणकाम करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करतआहेत.
घरातील वातावरण धार्मिक स्वरूपाचे आहे. आर्थिक परिस्थिती कमकुवत असली तरी शिक्षणाच्या बाबतीत मुलांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. निलम भावंडांमध्ये  सर्वात मोठी तर एक लहान बहीण व एक लहान भाऊ असा त्यांचा परिवार आहे. सिंधी समाजात नोकरी करणा-यांचे प्रमाण कमी आहे.व्यवसाय करण्याकडे कल अधिक असतो पण आपल्या मुलांनी शिक्षण घेतलेच व स्वावलंबी बनले पाहिजे अशी निलमच्या आई, वडीलांची इच्छा असल्याने त्यांनी शिक्षण देण्यात कुठेही उणीव भासू दिली नाही. निलमच्या मनातही लहानपणीच ही इच्छा दृढ होत होती. शासकीय अधिकारीपदी नोकरी हे आता पालकांप्रमाणे तिचेही स्वप्न बनले होते. 
शैक्षणिक प्रवास
      निलमचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अमळनेर येथेच साने गुरुजी विद्यालयात झाले. त्यानंतर नाशिक येथे ऑटो मोबाईल विषयात डिप्लोमाचे शिक्षण घेतले.तर जळगाव येथे मेकॅनिकल विषयात इंजिनियरींगचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण घेत असतांना व नंतरच्या काळात कापड दुकानात अकौंटंट,जळगाव येथे मार्केटिंग प्रतिनिधी म्हणून काम केले. शासकीय अधिकारी म्हणून नोकरी करण्याच्या दृष्टीने स्पर्धा परिक्षेचा अभ्यास सुरू केला. त्यासाठी स्वयं अध्ययन केले. खुप मेहनत घेतली. विविध स्पर्धा परिक्षा देऊन स्वतःला तयार केले.यातून आत्मविश्वास वाढत गेला. सन २०१७ मध्ये उपनिरीक्षक (मोटार व वाहने) (Assistant Inspector of Motor Vehicle) या पदासाठीची परिक्षा उत्तीर्ण झाले. शासकीय कार्यप्रणालीप्रमाणे सन 
२०१९ च्या डिसेंबर महिन्यात 
निलमची वरील पदावर नियुक्ती झाली. त्याबद्दल बोलतांना निलम म्हणाली की,  योगायोगाने जळगाव येथेच माझी नियुक्ती झाली आहे.आता प्रशिक्षण सुरु आहे.
आई - वडीलांची स्वप्नपूर्ती
       आई-वडिलांनी मोठ्या कष्टाने मला शिकवले. घरात काटकसर केली पण शिक्षणात मला व भावंडांना काहीही कमी पडू देत नाही. त्यामुळे मी हे यश मिळवू शकले. त्यांचे स्वप्न तर पूर्ण झालेच पण यामुळे त्यांचा स्वाभिमान व मान सन्मान वाढणार आहे. माझ्या नावाने त्यांना परिसरात नवी ओळख मिळणार आहे. पालकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी घेतलेली प्रामाणिक मेहनत,आई,वडील, कुटुंबातील जेष्ठ व्यक्ती व देवाचा आशिर्वाद यांच्या मुळे मला हे यश मिळाले आहे असेही नम्रपणे निलमने सांगितले. 
मुलींना शिकवा,स्वावलंबी बनवा
      समाजात आजही काही ठिकाणी मुलींच्या शिक्षणाबाबत उदासीनता दिसून येते. पालकांनी मुलींना मुलांप्रमाणेच शिकवावे. मुलींनाही नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. मुलांच्या भवितव्यावर त्या कुटूंबाचे भवितव्य अवलंबून असते. त्यामुळे मुलांनी पालकांचा मान सन्मान राखला पाहिजे. आपली संस्कृती टिकवण्याची जबाबदारी तरूणांची आहे याचे भान ठेवले पाहिजे अशी अपेक्षा निलम सैनानी हिने व्यक्त केली. 
सत्काराचा मान
या यशाबद्दल निलमचा अमळनेर हेडलाइन्स परिवारातर्फे सत्कार करण्यात आला. तसेच अमळनेर नपाच्या महिला नगरसेविका सौ.नुतन महेश पाटील यांच्या हस्तेही सत्कार करण्यात आला. 
समाजाची वाढविली शान
      सिंधी समाजात नोकरी करण्याचे प्रमाण कमी असले तरी आता बदलत्या काळाबरोबर खाजगी किंवा सरकारी नोकरी करण्याकडे तरूण विचार करायला लागले आहेत. पण मुलीने नोकरी करणे ही उत्सुकतेची बाब म्हटली पाहिजे. सामान्य कुटुंबातील मुलगी जेव्हा असे यश मिळवते तेव्हा ते इतर तरूण-तरूणींसाठी प्रेरणा देणारे ठरते.समाजाच्या सन्मानाचा तो विषय ठरतो.समाजाची शान वाढत असते.अशा यशस्वी व्यक्तीस समाज नेतृत्वाने प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे.
---------------------------------------------------------------------------------
ओम टी पान मसाला च्या नविन दालन


No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines