अमळनेर :अमळनेर पोलिसांनी धडक कारवाई करून परिसरात मोटारसायकली चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना अटक केली आहे.त्यांच्या ताब्यातून २४ मोटारसायकली आणि १५ लाख ६३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अमळनेर परिसरातील वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांवर आळा बसण्याची शक्यता आहे.
यांचे लाभले मार्गदर्शन
या कारवाईत पोलीस पथकाला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.माहेश्वरी रेड्डी,अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायकराव कोते यांचे मार्गदर्शन लाभले. या मोहिमेचे नेतृत्व अमळनेरचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी केले.
तांत्रिक तपासातून चोरटे हेरले
गुन्हे शोध पथकाने शहरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि इतर तांत्रिक पुरावे तपासले. संशयितांचा मागोवा घेत धडगाव (जि. नंदुरबार) परिसरातील दोन इसम हिंमत रेहज्या पावरा व अंबालाल भुरट्या खरडे,दोघे रा.सातपिंप्री, ता. शहादा,जि.नंदुरबार यांना अटक करण्यात आली.
२४ मोटारसायकलींसह लाखोचा मुद्देमाल हाती
अटक केलेल्या दोन्ही आरोपींनी अमळनेर तसेच इतर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून मोटारसायकली चोरीची कबुली दिली.त्यांनी चोरी केलेल्या गाड्या सातपिंप्री येथील जंगल परिसरात लपविल्याची माहिती दिली. त्याठिकाणी पोलिस पथकाने छापा टाकून २४ मोटारसायकली जप्त केल्या.
या वाहनांमध्ये होंडा युनिकॉर्न, शाईन,बजाज पल्सर, टीव्हीएस रायडर,हीरो स्प्लेंडर इत्यादी कंपन्यांच्या गाड्यांचा समावेश आहे. त्यांची एकूण किंमत १५,६३,०००/- रुपये इतकी आहे.
गुन्हा नोंद व पुढील तपास
सदर आरोपींवर अमळनेर पोलीस स्टेशनला गु.र.नं. ३०८/२०२५, भा.न्या.सं. कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.हे.कॉ. काशिनाथ पाटील व सागर साळुंखे हे करीत आहेत.
कारवाई पथकात यांचा सहभाग
या यशस्वी कारवाईत पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज,पोकॉ. प्रशांत पाटील,गणेश पाटील, उज्वलकुमार म्हस्के,नितीन मनोरे,उज्वल पाटील,हितेश बेहरे यांनी विशेष परिश्रम घेतले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.
