--------------------------------------------------------------------
- * जाहीरात * -
-----------------------------------------------------------------------
अमळनेर - तालुक्यातील मेहेरगाव येथील रहिवासी व जानवे ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक प्रवीण श्रीधर पाटील यांचा मुलगा प्रथमेश प्रवीण पाटील हा आज भारतीय सैन्य दलात लेफ्टनंटपदी रूजू झाला आहे. मेहनतीने मिळवले यश
प्रथमेश हा लहानपणापासून हुशार बुद्धिमत्तेचा आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेहरगाव येथे तर माध्यमिक शिक्षण अमळनेर येथील साने गुरुजी विद्यालयात झाले. "मुलाचे पाय पाळण्यात दिसतात" या वाक्याप्रमाणे माध्यमिक शिक्षणात प्रथमेशने चुणूक दाखवायला सुरुवात केली. त्यावेळी तो एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून नावारूपाला आला. उत्तम क्रिकेटर म्हणून नाव मिळवले. असतांनाच इयत्ता दहावीच्या वर्गात प्रवेश घेतला, व आपल्या इयत्ता दहावी त्याने ९५ टक्के गुण मिळवून आपली बुद्धिमत्ता सिद्ध केली. दरम्यानच्या काळात प्रथमेशचा मन मिळावू स्वभाव व बुद्धीमत्ता पाहून शाळेतील शिक्षकांनी व आई वडिलांनी त्याच्यावर चांगले संस्कार केले. तसेच शाळेतील शिक्षक डी. ए. धनगर व मुख्याध्यापक एस.डी. देशमुख यांनी त्याला भारतीय सैन्य दलाविषयी माहिती दिली, त्याला त्याविषयी आवड निर्माण झाल्याने त्याने मनाशी सैन्यदलात अधिकारी होण्याचा दृढनिश्चय केला. त्यासाठी इयत्ता दहावी पास झाल्यानंतर त्याने औरंगाबाद येथील सैनिकी पूर्व सेवा संस्था अर्थात एसपीआय येथे प्रवेश मिळवला. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर सीबीएससी पॅटर्नच्या अभ्यासक्रमात प्रथमेशने प्रवेश घेतला व तेथे यूपीएससीची तयारी करू लागला. प्रथमेश बारावी उत्तीर्ण होऊन यूपीएससी परीक्षेच्या माध्यमातून राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी पुणे अर्थात एनडीए मध्ये दाखल झाला. त्याने तीन वर्षाचे खडतर साहसी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर देहरादून येथील इंडियन मिलिटरी ऍकॅडमी येथे एका वर्षाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. सिंहगड कंपनीचा कॅडेट म्हणून प्रथमेशने उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अकॅडमी कडून दोन सन्मानचिन्ह प्रदान करून समारंभपूर्वक गौरवण्यात आले. देहरादून येथील आयएमए येथे पार पडलेली पासिंग आऊट परेड पूर्ण होऊन आसाम येथील सिलिगुडी येथे प्रथमेश पाटील आज दि. १५जून २०२० रोजी लेफ्टनंट म्हणून भारत मातेच्या सेवेसाठी रुजू झाला आहे.
सर्वत्र होत आहे अभिनंदन
प्रथमेश पाटील याने या कामगिरीमुळे खान्देशचे नाव उज्ज्वल केले आहे. ग्रामीण भागातील तरुणांना देशसेवेचे धडे दिले आहेत आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक माजी आमदार गुलाबराव पाटील अध्यक्ष हेमकांत पाटील,सचिव संदीप घोरपडे व सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक एस.डी. देशमुख, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, मेहरगाव येथील घनश्याम पाटील व परिसरातील आप्तस्वकीय यांनी त्याचे अभिनंदन केले आहे व तालुक्यात सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे
No comments
Post a Comment