अमळनेर:- शहरातील न्यू प्लॉट भागात ७५ ते ८० वर्षांपासून भाड्याच्या घरात रहिवास असतांना सदर भाडेकरूची कोणतीही संमती न घेता जेसीबीच्या साहाय्याने बेकायदेशीरपणे त्यांचे घर जमीनदोस्त करणे,सामानाचे नुकसान करणे शहरातील एका नामांकित बिल्डरला चांगलेच महागात पडणार आहे.सदर प्रकरणी बिल्डर सरजू गोकलानी सह पाच ते सहा जणांवर अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर प्रकरणाने शहरात खळबळ माजली आहे.
काय आहे प्रकरण
याबाबतची अधिक माहिती अशी की न्यू प्लॉट भागातील देशमुख चाळ,टीपी नंबर ४५ /०१ येथे शरद जाधवराव शिंदे यांचे दोन रूमचे लोखंडी पत्र्याचे भाड्याचे घर असून येथील वीज कनेक्शन व नळ कनेक्शन त्यांच्याच नावावर आहे.त्यांच्या कुटुंबाचा ७५ ते ८० वर्षापासून या घरात रहिवास आहे. दिनांक १० फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास त्यांची कोणतीही समंती नसतांना सरजु गोकलानी यांचे सांगण्यावरुन त्यांचे ४ ते ५ इसम व महेश देशमुख सर्व राहणार अमळनेर आदींनी शिंदे यांच्या घरात बेकायदेशीर प्रवेश करुन संपूर्ण घर जेसीबीने पाडुन जमीनदोस्त केले. सदर घटना म्हणजे 'मै अमळनेर का किंग हु मेरा कोन बाल बाका नही कर सकता' या अहंकाराचा परिणाम तर नाही ना? अशी चर्चा होत आहे.
घराचे नुकसान व गुन्हा दाखल
त्या रुममध्ये असलेले लोखंडी गोदरेज कपाट, लोखंडी रॅक,स्टीलचा रॅक,गॅसची स्टीलची शेगडी, कुलर, २ फॅन असे अंदाजे २००००/-रुपये किमतीच्या सामानाचे नुकसान करुन शिवीगाळ व दमदाटी केली.त्यामुळे शरद शिंदे यांनी बिल्डर सरजु गोकलानी, त्यांचे ४ ते ५ इसम व महेश देशमुख यांचेविरुध्द अमळनेर पोलिसात कायदेशिर फिर्याद दिल्याने वरील सर्वाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३२९(३),३२९(४),३२४(४),३५२,३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड हे करीत आहेत. कायद्याने व्यवसाय करायला कोणालाही बंदी नाही.पण कायद्याला न जुमानता वागणे चुकीचेच आहे.पोलिसांनी गुन्हा दाखल करून कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही असाच संदेश दिला आहे अशीही चर्चा जनतेत होत आहे.
