------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------
अमळनेर - कोरोना आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सुरू करण्यात आलेल्या लॉकडाऊन नंतर दि.१ जून पासून देशात अनलॉक - १ सुरू करण्यात आले आहे. शासनाने दिलेल्या नवीन निर्देशानुसार स्थानिक पातळीवर काही सवलत देऊन निर्धारित वेळेत दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यानंतर मात्र नवीनच प्रश्न समोर आले असल्याचे दिसून येत आहे. दुकानदारांवर कारवाई
अमळनेर शहरातील दुकाने दररोज सकाळी ९ ते दुपारी ३ यावेळेतच सुरू ठेवावीत. दुपारी तीन वाजेनंतर केवळ अत्यावश्यक सेवा (दवाखाना व मेडिकल) वगळता इतर कोणतेही दुकान सुरू ठेऊ नये असे निर्देश जारी करण्यात आले आहेत.पण शहरातील काही हॉटेल्स व बिअर बार या वेळेच्या व्यतिरिक्त सुरू असल्याचे आढळून आल्याने प्रशासनाने कठोर कायदेशीर कारवाई केली आहे. यात हॉटेल पुनम,हॉटेल प्रतिभा,हॉटेल जनता,हॉटेल कुणाल व हॉटेल योगेश ही दुकाने वेळेबाबतच्या नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे मद्य विक्री करतांना आढळले. त्यामुळे दुकाने सील करण्यात आली आहेत. तसेच पुढील आदेश येईपावेतो मद्य विक्री परवाना रद्द करण्यात आला आहे. तर संबंधित विभागाने आपला परवाना कायमस्वरूपी रद्द का करण्यात येऊ नये अशी नोटीस या दुकानदारांना बजावली असून आठ दिवसांत खुलासा करावा असे निर्देश दिले आहेत. 

हॉटेल पार्सल सर्व्हिस तीन वाजेपर्यंतच
अमळनेर शहरातील काही हॉटेल्स फक्त पार्सल सर्व्हिस करीत आहेत. या दुकानांना देखील सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंतचा कालावधी बंधनकारक असून त्यांनीही आपली दुकाने दुपारी तीन वाजेनंतर बंद ठेवावीत असे शासकीय निर्देश असून पार्सल सर्व्हिस देणा-या व्यावसायिकांनी या नियमांचे पालन करावे असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
हॉटेल व्यावसायिकाप्रमाणे काल इतर व्यापारी दुकानावरही कारवाई करण्यात आली आहे. येथील बाजारातील बाबा सिलेक्शन या दुकानदारांवर एक हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात आली आहे.
भाजी लिलाव आता फायनल प्लॉट १२३ च्या मोकळ्या जागेत
अमळनेर येथील डेली भाजीपाला बाजाराचा लिलाव नेहमी लालबाग शॉपिंग कॉम्प्लेक्स मागील भागात होत असतो. या ठिकाणी होणारी गर्दी, त्यामुळे सोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे होणारे उल्लंघन यामुळे प्रशासनाने भाजीपाला लिलाव फायनल प्लॉट नं १२३ (जुना बस स्टॅंड) या मोकळ्या जागेत करण्याचा निर्णय घेतला आहे. नगर पालिकेने या मैदानाचे सपाटीकरण,स्वच्छता केली आहे. या जागेत असलेले सौराष्ट्र गॅरेज व इतर दुकानांचे अतिक्रमण नुकतेच हटविण्यात आले आहे.
उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे,तहसिलदार मिलिंद वाघ,नपाच्या मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड,प्रशासन अधिकारी संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल व कर्मचारी यांनी सदर अतिक्रमण काढून मैदान मोकळे केले आहे.

उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे,तहसिलदार मिलिंद वाघ,नपाच्या मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड,प्रशासन अधिकारी संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल व कर्मचारी यांनी सदर अतिक्रमण काढून मैदान मोकळे केले आहे.
शासनाच्या निर्देशांचे सर्वांनी पालन करावे - नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई होणार
अनलॉक -१ सुरू झाल्यानंतर नागरिक व दुकानदार यांच्यासाठी शासनाने निर्देश जारी केले. त्यानुसार शासनाने ज्या दुकानांना सुरू करण्यास बंदी घातली आहे ती दुकाने वगळता अन्य सर्व दुकाने दररोज सकाळी ९ ते दुपारी ३ या कालावधीत उघडण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. तसेच नागरिकांनी अतिशय महत्वाचे काम असल्याशिवा घराबाहेर पडू नये, घराबाहेर पडतांनाा मास्क किंवा रूमालाचा वापर करावा व सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, वारंवार साबणाने हात धुवावेत, सॅनिटायजरचा नेहमीच वापर करावा. त्याचप्रमाणे वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. दुकानदारांनी नियमांचे पालन करावे. नियम न पाळल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. मागील काही दिवसात अशा दुकानदारांवर नपाने कारवाई केली आहे. यापुढेही दुकानदार व नागरिकांनी आपल्याच हितासाठी असलेले हे नियमांचे कसोशीने पालन करावे व शासनास सहकार्य करावे असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
अमळनेर शहरातील नगर पालिका,महसूल विभाग व पोलीस विभाग या प्रशासकीय यंत्रणेतील अधिका-यांनी दुपारनंतर शहरात फेरफटका मारल्यास बेकायदेशीरपणे दुकाने सुरू ठेवणा-या व नियमांचे उल्लंघन करणारे दुकानदारांवर जरब बसेल व नियम गांभीर्याने पाळण्याबाबत जागरूकता निर्माण होईल अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.





