अमळनेर - नागरिकांच्या आपल्या विज बिलांबाबत ज्या तक्रारी असतील त्या त्वरित सोडविण्यात येतील असे आश्वासन येथील विज वितरण कंपनीच्या अधिका-यांनी भारतीय ग्राहक पंचायतीच्या शिष्टमंडळास दिले. शिष्टमंडळाने विविध विषयांवर अधिकारी वर्गाशी चर्चा केली.
या आधी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने दिनांक ६ जुलै २०२० रोजी अवाजवी बिलांच्या तक्रारी व वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्या बाबत निवेदन देण्यात आले होते. त्यानुषंगाने अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री प्रशांत ठाकरे साहेब यांनी ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष व सदस्यांना दिनांक २१ जुलै रोजी सविस्तर चर्चेसाठी पाचारण केले होते . श्री ठाकरे यांनी निवेदनातील प्रत्येक मुद्दा व्यवस्थित समजावून घेतला व स्पष्टीकरण दिले. त्यात त्यांनी वारंवार वीज पुरवठा खंडित होतो याबद्दलची सविस्तर माहिती दिली त्यात प्रामुख्याने ताडेपुरा व प्रताप मिल फिडरवर क्षमतेपेक्षा जास्त विज भार असल्याने तो कमी करून नवीन फिडर तयार करण्याबाबत विशद केले. जेणेकरून वारंवार वीज पुरवठा खंडित होणार नाही तसेच लॉकडाऊनच्या काळात कंटेनमेंट झोनमध्ये मान्सूनपूर्वची कामे पूर्ण करता आली नाही,त्यामुळे या पावसाळ्यात पाऊस आल्यानंतर झाडाच्या फांदीचा जर तारेस स्पर्श झाली तरी ट्रीप होऊ शकते ते कामे आता सुरू आहेत. त्यामुळे हा त्रास पुढे होणार नाही, असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे किरकोळ तक्रारींची कामे करताना वीज पुरवठा त्या - त्या भागापुरता बंद करावा लागतो जसे कार्बन येणे , फ्यूज टाकणे वगैरे. तसेच बिलांच्या तक्रारी आल्यानंतर तक्रारी त्वरित सोडवण्यात येतील असे त्यांनी अाश्वस्त केले.चालू महिन्यात ग्राहकांना वीज बिल घरपोच मिळतील अशी व्यवस्था करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.ज्या ग्राहकांना वीज बिल मिळत नसतील त्यांनी शेजारच्या ग्राहकांचे वीज बिलाची झेरॉक्स सोबत आणावे जेणेकरून त्यांच्या चक्र मार्ग चुकला असल्यास तो दुरुस्त करण्यात येईल जेणेकरून त्यांना घरपोच बिल पुढील महिन्यात मिळेल. बर्याचदा ग्राहकांना क्रेडिट बिल निघाल्यास ते देण्यात येत नाही. त्यामुळे ग्राहकांनी विज बिल कार्यालयात येऊन तपासून घ्यावे असे सांगितले.
लॉकडाउनच्या काळात अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री ठाकरे यांच्या कुशल नेतृत्वाखाली अमळनेर शहरवासीयांना कोणत्याही प्रकारच्या वीज पुरवठ्यात खंडित होणार नाही याची त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष काळजी घेतली व अहोरात्र त्यांनी मेहनत घेतलेली आहे व एक प्रकारे त्यांनी कोरोना योद्धा म्हणूनच काम केलेले आहे त्याबद्दल अमळनेर ग्राहक पंचायतीतर्फे त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.
याप्रसंगी अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री प्रशांत ठाकरे, सहाय्यक अभियंता श्री निलेश कुरसंगे व वैभव देशमुख उपस्थित होते. तर ग्राहक पंचायतीतर्फे अध्यक्ष मकसूद बोहरी, सचिव विजय शुक्ल , ऊर्जा मित्र सुनील वाघ, अॅड. भारती अग्रवाल व योगेश पाने उपस्थित होते अशी माहिती प्रसिद्धीप्रमुख मेहराज हुसेन यांनी दिली आहे.
No comments
Post a Comment