जळगाव - हवामानावर आधारित केळी फळपिक विमा योजनेचे अन्यायकारक निकष बदलणे या मागणीचा पाठपुरावा करण्याकरिता नवी दिल्लीत पंतप्रधान कृषी विमा योजनेचे अतिरिक्त सचिव आशिष कुमार भूतानी यांची भेट घेऊन खासदार उन्मेश दादा पाटील यांनी त्यांच्याशी चर्चा केली.
या मागण्यांबाबत सविस्तर माहिती अशी की,खासदार उन्मेश दादा पाटील यांनी अतिरिक्त सचिव यांना सदर विषयात तात्काळ कार्यवाही करून पूर्वीप्रमाणे निकष लागू करून नवीन निविदा प्रक्रिया करण्याबाबत राज्य सरकारला आदेशीत करण्याबाबत चर्चा केली असता लवकरच हवामानावर आधारित केळी फळ पिक विमा योजना निकष पूर्ववत करून आदेश दिले जातील असे सांगितले.
केळी फळ पिक विमा योजना निकष पूर्ववत होणार
जळगाव लोकसभा मतदार संघात प्रामुख्याने कपाशी सोबत केळी पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. गेल्या पाच वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतर्गत हवामानावर आधारित फळ पिक विमा योजनेत केळी पिकांच्या मानांकनामध्ये शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन अटी व शर्ती यांचा समावेश करून बळीराजास पोषक हवामानावर आधारित अशी विमा योजना निकष ठरविण्यात आले होते. मात्र सध्याच्या महाविकासआघाडीच्या सरकारने २०२० -२१ ते २०२२ - २३ या कालावधी करिता केळी पिकांच्या निकषांमध्ये अतिशय अन्यायकारक बदल केले असून यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असंतोष असून याचा पुनर्विचार होऊन सन २०१९ -२० चे निकष कायम ठेवावेत.अशी मागणी करण्यात आली होती. यावर राज्य सरकारने पूर्वी प्रमाणे निकष कायम करण्याबाबत केंद्र सरकार ला प्रस्ताव पाठविला होता या अनुषंगाने नवी दिल्ली येथे खासदार उन्मेशदादा पाटील यांनी सकारात्मक चर्चा केली. यावेळी राज्य सरकारला आदेश देऊन निकष पूर्ववत ठेऊ अशी ग्वाही अतिरिक्त सचिव यांनी खासदार उन्मेश दादा पाटील यांना दिली आहे.
No comments
Post a Comment