चोपडा रस्त्यावर अपघातांची मालिका - रस्ता आहे का मृत्यूचा सापळा?

भरधाव क्रेनच्या धडकेने वृध्दाचा मृत्यू - गुन्हा दाखल


*अमळनेर -* शहरातून चोपड्याकडे जाणा-या मार्गावर फरशी रोड ते सिंधी कॉलनी दरम्यान मागील काही दिवसात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. जिवघेणा अपघात,रस्त्याची दुरावस्था व सिंधी कॉलनी लगतच्या रस्त्यावर बंद असलेले पथदिवे यामुळे दररोज ये - जा करणा-यांच्या समस्येत वाढच होतांना दिसत आहे. आज दुपारी क्रेनच्या धडकेने वृध्दाला आपले प्राण गमवावे लागले. सदर घटनेची पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
कुठे घडली घटना
अमळनेर शहरातील चोपडा रोडलगत असलेल्या श्री गजानन महाराज मंदिराजवळ भरधाव वेगाने येणा-या क्रेनने जयरामदास धर्मांनी या वृध्द सिंधी व्यावसायिकाला जोरदार धडक दिली. याबाबतची अधिक माहिती अशी की,शहरातून चोपडयाकडे जाणा-या रस्त्यावर  सिंधी कॉलनीकडे सायकलवर जात असलेल्या जयरामदास धर्मानी यांना मागून भरधाव वेगात आलेल्या क्रेन क्र. एम.एच.१९ सी.व्ही. १६७७ ने जोरदार धडक दिली. त्यांना ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. 
नागरिक संतप्त
अपघातानंतर नागरिकांची घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. भरधाव वेगाने जाणारी अवजड वाहने व वारंवार घडणा-या छोट्या मोठ्या दुर्घटना यामुळे दररोज वापरणा-या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.संतप्त नागरीक कठोर कारवाईची मागणी करत होते. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांची समजूत काढली व कारवाईचे आश्वासन दिले. क्रेन चालक घटनेनंतर पळून गेला होता. पोलिसांनी नंतर क्रेन ताब्यात घेतल्याचे समजते.
गुन्हा दाखल
मयत जयरामदास दर्यानोमल धर्मानी (वय ७२) यांचा पुतण्या मनोज आवतराम धर्मानी यांनी सदर क्रेनच्या चालकाविरूध्द अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०६(१),१८५,१२५(ए) १२५(बी), मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम १३४(बी),१८४ अन्वये गुन्हा भाग रजि.५ दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ.गणेश पाटील हे करीत आहेत.
कठोर कारवाईची मागणी
चोपडा रोडवरील पैलाड पासून ते सिंधी कॉलनी पर्यंतचा रस्ता हा अतिशय खराब झालेला आहे. नागरिकांना आपली वाहने चालवितांना अक्षरशः कसरत करावी लागते. हा रस्ता अतिशय रहदारीचा असल्याने वाहनांची खुप गर्दी असते. तशातच गजानन महाराज मंदिरापासून ते सिंधी कॉलनी पर्यंतचे रस्त्यावरील पथदिवे बंद स्थितीत असल्याचीही नागरिकांची तक्रार आहे. संबंधित विभागाने रस्ता दुरूस्ती व पथदिवे लावण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. रेती वाहतूक करणा-या डंपरमुळे वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे दिवसा गर्दीच्या वेळेत अवजड वाहनाना देखील बंदी करण्यात यावी अशी मागणीही जनतेतून होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.