कुठे व कशी घडली घटना
या घटनेची माहिती अशी की,शहरातील सिंधी कॉलनी भागातील ही मुले दुपारी साडेचार ते पाच वाजेच्या दरम्यान चोपडा रस्त्यावरील खदानीकडे गेली असावीत.
खदानीत असलेल्या उंचवट्यावर उभे राहून सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत असतांना एका मित्राचा पाय घसरला व तो पाण्यात पडला.त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात इतर दोघेही पाण्यात पडले. ही घटना रस्त्यावरून जात असलेल्या रिक्षावाल्याच्या लक्षात आली. घटनेची माहिती पोलिसांना ११२ नंबरवर फोन करून देण्यात आली. काही वेळातच स्थानिक नागरिक व पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले.शर्थीचे प्रयत्न करून तीनही मुलांना बाहेर काढण्यात आले. पण तोपावेतो त्यांचा मृत्यू झाला होता.
सर्वत्र हळहळ
या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या मुलांची नावे मानव बंटी रतनानी,कार्तिक विकी उधवानी,दिनेश विजय पंजवानी अशी आहेत. तीनही मुले एकमेकांचे मित्र होते. आज ७ - ७ तारीख असल्याने एकत्र सेल्फी काढण्यासाठी हे तिघं खदानीकडे गेले असल्याची चर्चा आहे. अतिशय सामान्य कुटुंबातील मुलांचा अतिशय दुःखद व दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दुःखाचे वातावरण
तीनही मुलांचे ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेमुळे मृतांचे पालक, सिंधी कॉलनीतील रहिवासी व मृतांच्या नातेवाईकांमध्ये दुःखाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांना शोक अनावर झाला आहे.
रात्री करण्यात आले अंत्यसंस्कार
ग्रामीण रूग्णालयातील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काल रात्री ११ वाजता मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
काळजी घेण्याचे आवाहन
अमळनेर शहरालगत असलेले पाणीसाठे,खदानी या ठिकाणी पावसाळ्यात पाणी पातळी वाढलेली आहे. त्याचा अंदाज न आल्याने अशाप्रकारची दुर्घटना घडण्याची दाट शक्यता असते.त्यामुळे सर्वांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. पालकांनी आपल्या मुलांना अशा दुर्घटनेबाबत वेळीच जाणीव करून दिली पाहिजे. तसेच अशा धोकादायक खदानी व पाणीसाठे याबाबत प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे गरजेचे आहे. याचाही विचार होणे आवश्यक आहे.

