वरिष्ठांचे आदेश व मार्गदर्शन
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे,अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या आदेश व मार्गदर्शनाने व अमळनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या उपस्थितीत अमळनेर पोलीस स्टेशन हद्दीत शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली.
काय झाली कारवाई
या कोंबिंग ऑपरेशनमध्ये विविध प्रकारची कारवाई करण्यात आली. यात तीन व्यक्तींकडून ३० हजार रुपये किंमतीची एक पिस्तूल,६ हजार रुपये किंमतीचे तीन जिवंत काडतूस,७ लाख रुपये किंमतीची एक इर्टीगा कार असा ७ लाख ३६ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.तर दुस-या एका कारवाईत २ हजार रुपये किंमतीची एक तलवार जप्त करण्यात आली.
दारूबंदी कायद्याअंतर्गत नऊ ठिकाणी कारवाई करण्यात आली.त्यात १,१५,६४० रुपये किंमतीचे हातभट्टी दारूचे २५० लिटर उकळते रसायन,१४०० लिटर कच्चे रसायन,१४० लिटर तयार दारू,४१ लिटर दारूच्या ९० एमएल मापाच्या बाटल्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अमळनेर शहरात जुगारबंदी कायद्यानुसार चार ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत २८९० रूपये रोख व जुगाराची साधने जप्त करण्यात आली.
दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या एकूण ११३ व्यक्ती तर हिस्ट्रीसीटर २५ जणांना तपासणी व चौकशीसाठी पोलीस स्टेशनला आणण्यात आले होते. तर सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणा-या ३२ जणांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११२/११७ अन्वये कारवाई करण्यात आली.
कोटपा सदराखाली शहरात करण्यात आलेल्या कारवाईत ६०० रूपये किंमतीचे तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले.
भारतीय न्याय संहिता कलम २८५ अन्वये रहदारीस अडथळा ठरणा-या सात वाहनांवर कारवाई करण्यात आली.तर इतर ३६ प्रकरणात ५१,२०० रुपये दंड ठोठावण्यात आला.
त्याचप्रमाणे इतर गुन्ह्यात ६ वाहन चालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली.
हरवलेल्या(मिसिंग)एकूण ३९ व्यक्तींचा शोध घेण्यात आला. त्यात ६ व्यक्ती मिळून आल्या. या कोंबिंग ऑपरेशन अंतर्गत १५ पकड वॉरंट,६ जामीन वॉरंट व २१ समन्स बजावण्यात आले.तर २१ व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.तसेच शहरातील ११ हॉटेल्स व लॉजिंगची तपासणी करण्यात आली.पोलिसांच्या या बेधडक कारवाईने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या घटकांमध्ये खळबळ उडाली आहे.
कारवाईत यांचा होता सहभाग
वरिष्ठ अधिका-यांच्या आदेश व मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत अमळनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम,६ दुय्यम अधिकारी,६२अंमलदार,जळगाव गुन्हे शाखेचे १ अधिकारी व १० अंमलदार यांचा समावेश होता.
यापुढेही होऊ शकते कारवाई
काल पार पडलेल्या कोंबिंग ऑपरेशन अंतर्गत वेगवेगळ्या गुन्ह्यात कायदेशीर कारवाई करण्यात आली असून वरिष्ठांच्या आदेशाने यापुढील काळातही अशी मोहीम राबविण्यात येऊ शकते असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

