ऑनलाइन सट्टाबेटींग अड्ड्यावर अमळनेर पोलिसांची धडक २८ लाख १८ हजार ६७० रुपयांच्या मुद्देमाल जप्तीसह ६ जणांवर कारवाई

Tuesday, December 10, 2019

/ by Amalner Headlines
अमळनेर -
  शहरातील पाटील कॉलनी हिराई पार्कमधील एका घरात सुरू असलेला ऑनलाइन सट्टाबेटींगचा अड्डा अमळनेर  पोलिसांनी उद्ध्वस्त केला असून याप्रकरणी सहा जणांना अटक  करण्यात आली आहे. त्यांच्याकडून रोख रकमेसह २८ लाख १८ हजार ६७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात कार,दुचाकी, लॅपटॉप,मोबाइल,एटीएमकार्ड,  पैसे मोजण्याचे मशीन, कॅलक्युलेटर, डायऱ्या आदी साहित्याचा समावेश आहे. पोलिसांनी ही सर्वात मोठी कारवाई केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर शहारातील हिराई पार्कमधील एका घरात ऑनलाइन सट्टाबेटिंगचा अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती  उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र ससाणे, पोलिस निरीक्षक अंबादास मोरे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना बोलवून याची माहिती दिली आणि त्यानुसार कारवाई करण्याचे आदेश दिले. पथकाने पाटील कॉलनी हिराई पार्कमधील महेंद्र सुदाम महाजन (वय ४२) याच्या बंद घरात छापा मारला. या वेळी तेथे महाजन याचे नोकर अमोल ज्ञानेश्वर बडगुजर (वय २४ वर्षे, धंदा खाजगी नोकरी रा. अमलेश्वरनगर अमळनेर), फिरोजखान नसीमखान पठाण (वय ३३ वर्षे, धंदा खाजगी नोकरी, रा. अंदरपुरा, सराफ बाजार, अमळनेर), नकुल राजधर माळी (वय ४४ वर्षे, धंदा खाजगी नोकरी, रा. झामी चौक अमळनेर),  जयंत गणेश पाटील (वय ३१ वर्षे, धंदा चालक, रा. पवन चौक अमळनेर),  पुंडलिक ईश्वर चौधरी (वय ३५ वर्षे, धंदा खाजगी नोकरी, रा. अमलेश्वर नगर अमळनेर)  हे कोणताही परवाना नसताना गैरकायद्याने स्वत:चे फायद्यासाठी “राजश्री राशी फल” नावाचा ऑनलाइन सट्टा जुगार त्यांच्या जवळील मोबाईल तसेच लॅपटापद्वारे खेळवतांना  दिसून आले. त्यांच्याकडून १६ मोबाईल हॅण्डसेट, ३५ एटीएम कार्ड, १ लॅपटाप, १ कार, २ मोटार सायकल, १ नोटा मोजण्याचे मशिन, २ कॅलक्युलेटर, रोख रुपये. व २६ डायऱ्या १३ बॉलपेन असा एकूण २८,१८,७६० रुपये असा ऐवज मिळून आले. याप्रकरणी पोलिस शिपाई रविंद्र अभिमन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीतांविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा कलम ४ व ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र ससाणे, पोलिस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी, पो.ना. शरद पाटील, दीपक माळी, रवींद्र पाटील, भटूसिंग तोमर, किशोर पाटील, रेखा ईशी, हितेश चिंचोरे, चालक सुनील पाटील यांच्या पथकाने सदर कारवाई  केली.
कसा खेळला जात होता ऑनलाईन  सट्टा…
उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र ससाणे आणि पोलिस निरीक्षक अंबादास मोरे यांनी स्वतः कारवाई सहभाग घेतला होता. त्यांनी संशयितांना विचारले असता सांगितले की, मालक महेंद्र सुदाम महाजन यांच्या सांगण्यानुसार 'राजश्री राशी फल' नावाचा ऑनलाईन सट्टा जुगार आमच्या ओळखीच्या लोकांकडुन ऑनलाइन मोबाइलद्वारे स्विकारुन खेळवीत आहोत. आमचेकडे या ऑनलाइन सट्ट्याचा कोणताही परवाना नाही. हा  सट्टा आम्ही आमच्याकडील मोबाईलवर घेत असून सट्टा खेळणारे लोक आमच्याकडील मोबाइल फोनवर फोन करून सट्टा लावतात. आम्ही त्यांची नोंद आमच्याकडील कागदावर व लॅपटॉपमध्ये करतो. सट्टा लागल्यानंतर व लावण्याअगोदर आम्ही त्यांच्याकडून आमच्या बँक खात्यावर पैसे भरण्यास सांगतो. त्यांना सट्टा लागल्यास आम्ही त्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा करीत असतो.


ओम टी पान मसाला च्या नविन दालन

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines