जळगाव - संरक्षण दलातील शौर्य पदकधारक आणि माजी सैनिकांच्या विधवांना राज्य शासनाच्या दि. ९ जानेवारी, २०१७ च्या शासन निर्णयानुसार त्यांच्या नावावर असलेल्या मालमत्तेच्या करातून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रात राहणारे जे सैनिक अविवाहीत आहेत व ते देशाचे संरक्षण करतांना शहिद झाले आहेत, अशा अविवाहित शहिद झालेल्या सैनिकांच्या नामनिर्देशितांना मालमत्ता करात सूट देण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे.
मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या कलम १३९ अन्वये बृहन्मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम १२७अन्वये महानगरपालिका व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या कलम १०५ अन्वये नगरपरिषदा, नगरपंचायती मालमत्ता कराची आकारणी करतात. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रात राहणाऱ्या , देशासाठी प्राणाची बाजी लावून जीवाची पर्वा न करता नि:स्वार्थीपणे देशाचे संरक्षण करताना बजाविण्यात आलेल्या उत्कृष्ट कामगिरीकरीता संरक्षण दलातील शौर्य पदकधारकांना आणि माजी सैनिकांच्या विधवांना त्यांच्या नावावर असलेल्या एका मालमत्तेच्या मालमत्ता करातून ९ जानेवारी २०१७ च्या शासन निर्णयानुसार सूट देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तरी संरक्षण दलातील शौर्य पदकधारक सैनिक तसेच माजी सैनिकांच्या विधवांनी जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांचे करमाफीस पात्रतेचे प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे आणि मालमत्ता कर माफीचा लाभ घ्यावा. असे आवाहन राज्य शासनाच्या शासन निर्णयानुसार जिल्हा प्रशासन अधिकारी, जळगाव किरण देशमुख यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
No comments
Post a Comment