अमळनेर - महिलांना शिक्षणाचा मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी क्रांतीसूर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या समाज सुधारक दांपत्याने मुलींची पहिली शाळा पुणे शहरात ज्या भिडे वाडयात सुरु केली त्या वास्तुची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. ही वास्तु शासनाने ताब्यात घ्यावी. महिला शिक्षणासाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या फुले दांपत्याचे भिडे वाड्यात राष्ट्रीय स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी आज विधान परिषदेत आ.श्रीमती स्मिताताई वाघ यांनी तारांकित प्रश्नाद्वारे केली.
यावेळी आ.स्मिता वाघ म्हणाल्या की,ज्या प्रमाणे डॉ.बाबासाहेब आंबेडकर लंडन मध्ये ज्या घरात राहून शिक्षण घेत होते ते घर मागील काळात राज्य शासनाने विकत घेऊन तेथे बाबासाहेबांचे स्मारक उभारण्यात आले आहे. त्याच प्रमाणे फुले दांपत्याने पुणे शहरात मुलींची पहिली शाळा सुरू केली त्या ठिकाणी असलेली आज भग्नावस्थेत आहे. त्याच जागेवर स्मारक उभारून त्यांच्या कार्यांचा सन्मान होणे आवश्यक आहे. शासनाने याबाबत तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी आ.वाघ यांनी तारांकित प्रश्नाद्वारे केली. या प्रश्नाच्या उत्तरात ना.एकनाथ शिंदे यांनी सांगितले की,शासन या स्मारकाच्या उभारणी बाबत सकारात्मक आहे.सदर जागेसंदर्भात काही खटले न्यायालयात सुरू आहेत. त्यात भक्कम बाजू मांडण्यासाठी सक्षम वकील उपलब्ध करून देऊ. चर्चेच्या माध्यमातून हा तिढा सोडविण्याचाही प्रयत्न सुरू आहे. तातडीने याबाबतची कार्यवाही करण्यात येईल असे ना.एकनाथ शिंदे यांनी आ.वाघ यांच्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.




