-------------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------
अमळनेर - तालुक्यात कोरोना व्हायरसच्या भितीदायक वातावरणातच काल अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसाने काही गावांमध्ये अक्षरशः थैमान घातले असून तालुक्यात तुरळक गारपीट व वादळी वारा झाल्यामुळे यंदाच्या रब्बी हंगामातील उरली सुरली पिके पूर्णत: नष्ट झाली आहेत.दोन्ही आमदारांनी केली पाहणी
बुधवारी सकाळी आमदार अनिल पाटील व आमदार स्मिता वाघ, तहसीलदार मिलिंद वाघ, कृषी अधिकारी भरत वारे यांनी अवकाळी पावसाने झालेल्या गांवात जाऊन पिकांच्या नुकसानीची शेतशिवारात जाऊन पाहणी केली. आमदार पाटील व आमदार वाघ यांनी पंचनाम्याचे आदेश दिले आहेत.



या गावांना बसला फटका
यात मंगरूळ,चिमणपुरी,पिंपळे, लोंढवे,जवखेडा,अंचलवाडी आर्डी,आनोरे,वाघोदा,निसर्डी येथे अवकाळी पाऊस, बारीक गारपीटीने रब्बी पिकांना फटका बसला आहे. त्यात हाता-तोंडाशी आलेले पीक जमीनदोस्त झाले असून शेकडो हेक्टर रब्बी गहू, हरभरा,बाजरी,ज्वारी,कांदा,शेवगा,भाजीपाला,फळबागा मका आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हताश झाला. एका दिवसात होत्याचे नव्हते झाले. मंगळवारी संध्याकाळी ७ वाजता झालेल्या वादळी वारे व पावसाने थोड्याच वेळात गारपिटीला सुरूवात झाली. त्यानंतर काही वेळातच जोरदार गारपीट होऊ लागली. अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे शहरवासीयांची तारांबळ उडाली होती.वादळामुळे काही घरांचे छत उडाले तर तब्बल तासभर जोरदार पाऊस झाल्याने शहरातील रस्त्यांवर पाणी साचले होते. ग्रामीण भागात तर जनजीवन विस्कळीत झाले. तालुक्यातील पातोंडा भागात देखील वादळी पाऊस झाला. असून त्या भागात देखील अधिकारी वर्गाने पाहणी केली.मंगरूळ ,शिरूड ,वावडे,नगाव या मंडळात नुकसान झाले आहे.

अंदाजे प्राथमिक अहवाल
कृषी कार्यालयामार्फत तहसील विभागाला दिलेल्या प्राथमिक अहवालानुसार बाधित गावे आणि शेतकरी संख्या व गावे
शेतकरी संख्या - ४५९३
बाधित गावे - ४३
बाधित क्षेत्र-३५६२.९१ हेक्टर
No comments
Post a Comment