अमळनेर - तालुक्यातील मुंगसे या गावातील ६० वर्षीय महिला कोरोना बाधित असल्याचे आढळुन आले आहे. ही महिला जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी दाखल झाली होती. काल तपासणी अहवाल आल्यावर ती महिला कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहे. पुढील कार्यवाहीसाठी अमळनेर उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात सर्व अधिकाऱ्यांची बैठक झाली असून मुंगसे गावाच्या आजूबाजूचे चार गाव मुंगसे,सावखेडा,रूंधाटी,दापोरी ही सील करण्यात आली आहेत. तर संपूर्ण तालुक्यात यापुढील तीन दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्या चारही गावांमध्ये रात्रीच टीसीएल फवारणी झाली असून आज दि. १९ रोजी सुमारे ८ वैद्यकीय पथक गावात जावून त्या द्वारे गावांमधील प्रत्येक नागरिकाची तपासणी करण्यात येणार आहे.
मुंगसे ते जळगाव व्हाया चोपडा
या महिलेस सुरवातीला मुंगसे येथून चोपडा येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर जळगांव येथेही खाजगी रुग्णालयात उपचार केल्यावर जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी दाखल करण्यात आले होते. शनिवारी या महिलेचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.
प्रशासन सतर्क
रात्री १० वाजता प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी सर्व संबंधित अधिकारी आणि पोलिसांची बैठक घेऊन खबरदारीच्या उपाय योजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच आरोग्य यंत्रणा आणि पोलिस हे मुंगसे येथे पोहोचले असून या महिलेच्या संपर्कात कोण-कोण आले आहेत ? याचा शोध घेत आहेत. दरम्यान ह्या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून अमळनेरकर नागरिकांनी आता तरी गांभीर्याने खबरदारी बाळगावी असे आवाहन शासकीय यंत्रणा व सुज्ञ नागरिकांनी केले आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा प्रवेश झाल्याने संपूर्ण तालुक्याला सतर्क राहण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
तीन दिवस संचारबंदी
अमळनेर तालुक्यात कोरोना बाधित रूग्ण आढळून आल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रशासनाने आज पासून पुढील तीन दिवस तालुक्यात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व दुकाने,भाजीपाला खरेदी विक्री व्यवहार पूर्णपणे बंद रहाणार आहेत. कुणीही अत्यंत महत्वाच्या म्हणजे केवळ रूग्णालयात जाणे गरजेचे असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. संचारबंदीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी सावधगिरी म्हणून आपल्या घरातच थांबावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांनी केले आहे.





