अमळनेर - जळगाव येथील कोविड रुग्णालयात कोरोना संशयित म्हणून स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या व्यक्तींपैकी पाच व्यक्तींचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहेत. हे सर्व अहवाल पॉझिटीव्ह आढळून आले आहेत.
या पाचही व्यक्ती यापूर्वी कोरोना बाधित आढळून आलेल्या अमळनेर येथील मृत महिलेच्या कुटूंबातील आहे. यामध्ये ४ पुरुष व एक महिलेचा समावेश असून हे सर्व पुरुष २७ व २८ वर्षीय तर महिला ३६ वर्षीय आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.
दरम्यान अमळनेरात अजुन ५ रुग्णाची भर पडल्याने
अमळनेरची वाटचाल आता रेड झोन कडे होत असल्याने तालुक्यात चिंतेची लाट पसरली आहे.
परिसर या आधीच केला सील
सदर कुटुंबातील दांपत्याचा तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर प्रशासनाने परिसर निर्जंतुकीकरण करून सील केला आहे.कालपासून शहरातील दगडी दरवाजा पासून ते रूबजी नगर पर्यंतचा परिसर सील केला आहे. तीन दिवस तालुक्यात संपूर्ण जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने केले आहे.
आज जनतेचा चांगला प्रतिसाद
आजच्या जनता कर्फ्युच्या पहिल्या दिवशी भाजीपाला बाजार,किराणा दुकाने व मेडिकल दुकाने बंद ठेवण्यात आली होती. पोलीस दलाने कडक बंदोबस्त ठेवला होता. नागरिकांनी जनता संचारबंदीचे सकारात्मक दृष्टीने पालन केल्याचे चित्र आज दिसून आले. आता तर नवीन ५ जण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्याने नागरिकांना अधिक काळजी घेण्याची गरज आहे. अजूनही जे नागरिक नियमांचे पालन करत नसतील त्यांनी आता तरी गांभीर्याने वागण्याची आवश्यकता आहे. अमळनेरला कोरोनाचा हॉटस्पॉट होण्यापासून आपणच वाचवू शकतो याचे भान नागरिकांनी ठेवले पाहिजे.






