------------------------------------------------------------------------
अमळनेर - शहरात वाढणारा कोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध प्रकारचे प्रयत्न सर्व स्तरावर सुरू आहेत. तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्गाचे अनेक रुग्ण आढळून आले आहेत. जळगाव जिल्ह्यात अमळनेर तालुका हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे.
घरपोच किराणा योजना
शहरात कोरोनाचा संसर्ग वाढू नये या उद्देशाने अमळनेर नगर परिषदेने घरपोच अत्यावश्यक वस्तू देण्याचा निर्णय घेतला असून किराणा दुकानदार असोशियन व न.पा.प्रशासनाच्या वतीने त्याचे तातडीने नियोजन देखील झाले आहे. या योजनेची सुरुवात देखील झाली आहे. नागरिकांनी घराबाहेर न निघता नगर परिषदेने उपलब्ध करून दिलेल्या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधून आपल्या वस्तू घरपोच मागवाव्यात.
अन्य जीवनावश्यक वस्तूही घरपोच मिळण्याची सोय
नगर परिषदेने आपल्या प्रभागात किराणा विक्रेत्यां सोबतच मेडिकल ,फळ विक्रेता,भाजी विक्रेता इत्यादींचीही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. संबंधित विक्रेते हे योग्य भावात, कोरोना बाबत योग्य ती खबरदारी घेऊन आपल्या घरी आपल्या वस्तू पोचवणार आहेत.
नपाचे आवाहन - मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड
नपाने पुढाकार घेऊन जीवनावश्यक वस्तू घरपोच मिळण्याची सोय उपलब्ध करून दिली असल्याने कोणीही कोणत्याही कारणाने घराच्या बाहेर निघू नये असे आवाहन अमळनेर नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराब पाटील, मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांनी केले आहे.



