---------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------
अमळनेर - शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या १२ व ग्रामीण भागात १ अशी अमळनेर तालुक्यात एकूण संख्या १३ झाली आहे. त्यामुळे अमळनेर येथे कोविड केअर हॉस्पिटल सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील डॉक्टर्सनी सेवा देण्यासाठी पुढे यावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांनी केले आहे. अमळनेर तालुक्यात कोरोना बाधित रूग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. याबाबत असे आढळून आले आहे की किराणा दुकान किंवा तत्सम वस्तूंचे दुकान यातून तसेच होम क्वारेंटाईन केलेल्या व्यक्तींकडून तोंडी व लेखी सूचना देऊन देखील शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करण्यात येत नाही त्यामुळे संसर्ग वाढल्याचे दिसून येत आहे. रोज रुग्णांची संख्या वाढत असतांना देखील नागरिक अद्यापही सामाजिक अंतर पाळत नाहीत. अमळनेर नगर परिषद व कृषी विभाग यांचे मार्फत किराणा व भाजीपाला यांची घरपोच सेवा सुरू करण्यात आली आहे. तरी सर्व नागरिकांना प्रशासनामार्फत कळकळीचे आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी घराबाहेर पडू नये, जीवनावश्यक वस्तू घरपोच मागवाव्यात, सामाजिक अंतर पाळावे. कोरोना सदृश्य लक्षण दिसताच तात्काळ शासकीय रुग्णालयात जावे.
शहरात कोविड हॉस्पिटल
यापुढे रुग्णांची संख्या वाढणार असल्याने अमळनेर शहरात कोविड केअर हॉस्पिटल सुरू करण्यात येणार आहे. तरी खाजगी डॉक्टरांनी देखील सदर हॉस्पिटलमध्ये सेवा देण्यासाठी स्वतःहून पुढे यावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी अमळनेर सीमा अहिरे यांनी केले आहे.




