---------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------
अमळनेर - तालुक्यातील कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊन ४ मध्ये हजारो गरजू कुटुंबांना अन्न उपलब्ध व्हावे म्हणून प्रशासनाने केलेल्या सुचनेनुसार श्रीमती भानूबेन शहा गोशाळेतर्फे अन्नक्षेत्र उपक्रम पुन्हा सुरू करण्यात आला. यात अमळनेर विधानसभा मतदार संघाचे आ.अनिल पाटिल व जि.प.सदस्या सौ.जयश्री पाटील यांनी लग्नाचा वाढदिवस गरीब व गरजूंना अन्नदान करीत साजरा केला.
अमळनेर शहरातील गरीब गरजूंना लॉक डाऊन ४ मध्ये रोजगार उपलब्ध नसल्याने उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून प्रशासनाच्या वतीने तहसीलदार मिलिंद वाघ यांनी गोक्षेत्र प्रतिष्ठाण संचलित श्रीमती भानूबेन शहा गोशाळेस पत्र देऊन अन्नक्षेत्र उपक्रम सुरू करण्या बाबत सुचविले होते.त्यानुसार आ.अनिल पाटील यांनी पहिल्या दिवसाचा खर्च देत लग्नाच्या वाढदिवसाचे निमित्त साधून अन्नक्षेत्र पुन्हा सुरू करण्यात आले.यावेळी गोशाळेत जि.प. सदस्या सौ. जयश्री पाटिल यांच्या हस्ते अन्न वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी चेतन शहा यांनी आ.अनिल पाटील व सौ.जयश्री पाटील यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.तर प्रा.अशोक पवार, संदिप घोरपडे,रणजित शिंदे, गोपाळ कुंभार,मनोज चौधरी आदिंनी अन्नक्षेत्राला मदत केल्याबद्दल आभार मानले. याप्रसंगी माजी नगरसेवक विनोद कदम, युवक अध्यक्ष बाळू पाटिल तसेच मंगळ ग्रह मंदिर संस्थानचे विश्वस्त डिगंबर महाले, बाविस्कर सर,बहिरम सर ,संजय पालकर आदि यावेळी उपस्थित होते.

गोशाळेच्या उपक्रमास पुरस्कार
नुकताच डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटर नॅशनल फाउंडेशन तर्फे श्रीमती भानूबेन शहा गोशाळेस कोरोना साथीच्या काळात यशस्वीपणे सुरू असलेल्या अन्नक्षेत्र उपक्रमाच्या कार्याबद्दल डिजिटल पत्र पाठवून गौरविण्यात आले आहे.दिवंगत राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत नाशिक येथे सभारंभपूर्वक गौरव करण्यात येणार आहे. सदरचा गौरव हा अन्नक्षेत्राला मदत करणाऱ्या अनेक दात्यांच्या उदार भावनेचा व उत्स्फूर्त सहकार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते व सर्व पत्रकार बंधू आणि प्रशासनाच्या सामूहिक प्रयत्नांचा आहे असे गोक्षेत्र प्रतिष्ठानचेे संचालक चेतन शहा यांनी कृतज्ञतापूर्वक यावेळी सांगितले.




