अमळनेर:- गेल्या ६ वर्षांपासून मी आमदार असतांना माजी आमदारांचे अपप्रकार बंद केले होते. परंतु आता नगरपालिका निवडणुकीत यश मिळाल्याने निकालानंतर फक्त दहाच दिवसात अपप्रवृत्तीने पुन्हा तोंड वर काढले असल्याचा आरोप आमदार अनिल पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
यावेळी पत्रकारांना संबोधित करताना पुढे ते म्हणाले की शिवसेनेचे डॉ.बाविस्कर नगराध्यक्षपदी निवडले.पण ते त्यांचे क्रेडिट मुळीच नाही.आणि संख्याबळ पाहता आमचे एक दोन का असेना नगरसेवक जास्त निवडलेत तरीही आम्ही पराभव स्वीकारला आणि विरोधात बसण्याची भूमिका घेतली आणि त्यांना शुभेच्छा देखील दिल्या. परंतु पद्ग्रहण प्रसंगी यांनी ज्या पद्धतीने बेताल वक्तव्य केले ते कोण सहन करणार.संत सखाराम महाराज व पू. साने गुरुजी यांच्या भूमीत महिलांचा असा अपमान सहन केला जाऊ शकत नाही.तेथे काहींनी टाळ्या वाजवल्या याचाही आंम्हाला खेद वाटतो.म्हणजे ज्या महिला राजकारणात अथवा नोकरीला किंवा उद्योगात असतात त्या महिला नवऱ्याच्या ताब्यात राहत नाहीत का. माझी पत्नी गेल्या अनेक वर्षांपासून येथील जनतेची सेवा करीत असून हे कार्य ती सतत करत राहील.
मी काय विकास केला यावर ते बोलतात पण ५ वर्ष ते फिरलेच नाही. त्यामुळे झालेला विकास दिसणार नाही.चौधरी हे पुढील काळात शहरातील ज्या - ज्या भागात स्वतःच्या गाडीत बसून जातील तो रस्ता मीच केलेला त्यांना दिसेल.असा कोणता विकास नाही झाला ते त्यांनी सांगावे.यासाठी माझे खुले आव्हान आहे की समोरासमोर या.या वक्तव्यातून महिला सक्षमीकरणला रोखण्याचा त्यांचा प्रयत्न दिसत असून या अपप्रवृत्तीस आमचा विरोध आहे. आमदार म्हणून माझ्या आई बहिणींचा सन्मान ठेवणे माझी जबाबदारी आहे.ती मी पार पाडणारच आहे.पण अमळनेर कर जनतेला हेच बघायचे होते का? असा सवाल करत महिलांचा अपमान सहन केला जाणार नाही असे त्यांनी शेवटी सांगितले.

