लॉकडाऊनचे उल्लंघन,२२ दुकान मालकांविरूध्द गुन्हा दाखल अमळनेर तालुक्यात केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याचा आदेश उद्यापासून पुन्हा तीन दिवस जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन

---------------------------------------------------------------------------
         - * जाहीरात * -
---------------------------------------------------------------------------
अमळनेर - 
कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन-४ सुरू झाले आहे. अमळनेर तालुक्यातील कोरोनाचे रूग्ण कमी झाले आणि आपण आता कोरोनाला पळवून लावले या अति आत्मविश्वासाने अमळनेरकर दोन दिवसांपासून पुर्वीसारखेच रस्त्यावर उतरले आहेत. प्रशासनाने वारंवार सुचना देऊनही त्याकडे कानाडोळा करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच काही दुकानदारांनी बंदी असतांनाही आपली दुकाने उघडल्याने प्रशासनाने कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यात केवळ जीवनावश्यक वस्तूंचीच दुकाने निर्धारित वेळेत सुरू ठेवण्याचे निर्देश असून त्या नियमांचे व्यापारी व नागरिकांनी पालन करावे असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 
         आज (दि.१९) सकाळी १०:३० शहरातील लॉकडाऊनचा आढावा घेण्यासाठी उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे, तहसिलदार मिलिंद वाघ,नपाच्या मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड,प्रशासन अधिकारी संजय चौधरी हे अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्यामअग्रवाल,कर्मचारी यश लोहेरे, सुरेश चव्हाण,अविनाश बि-हाडे,विशाल सपकाळे यांच्यासह  शहरातील बाजार पेठ व इतर व्यापारी भागात पाहणी करीत असतांना त्यांना लॉकडाऊनचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे काही दुकाने उघडल्याचे व तेथे  सोशल डिस्टन्सींगचे पालन न करता गर्दी जमा करून वस्तूंची विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्याने सदर २२ दुकान मालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
        आज दि.१९ रोजी सकाळी १०:३० वाजेदरम्यान अमळनेर शहरातील भागवत रोड,गंगा घाट,लुल्ला मार्केट,लालबाग शॉपिंग कॉम्प्लेक्स या भागातील काही दुकाने लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे उघडण्यात आली होती. त्या दुकान मालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
या दुकान मालकांवर गुन्हा दाखल
        श्रीकृष्ण मोबाईल,आवो साई मोबाईल, खुशबू मोबाईल, बालाजी ईलेक्ट्रीकल्स,श्रीराम डिजीटल बॅनर,राजकमल फुट वेअर,साई मॅचिंग सेंटर,रॉयल फुट वेअर,आशु मेन्स वेअर,कृष्णा ट्रेलर,गोल्डन टेलर,डी.के.ऑटो गॅरेज,पुजा स्टील स्टॉल,महावीर बुक स्टॉल,सुजान कलेक्शन, विजय कलेक्शन,न्यु विजय कलेक्शन,उज्वल रेडीमेड,विराज कलेक्शन,किशोर प्रोव्हीजन, सचिन कलेक्शन  व आरिफ जनरल स्टोअर्स या दुकान मालकांवर अतिक्रमण विभाग  प्रमुख राधेश्याम अग्रवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भादंवि कलम १८८ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम ५१ ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पो.कॉ.कैलास शिंदे हे पुढील तपास करीत आहेत.
उद्यापासून तीन दिवस जनता कर्फ्यु - तहसिलदार मिलिंद वाघ
         अमळनेर तालुक्यात पुर्वी सारखेच लॉकडाऊन व सोशल डिस्टन्सींगचे पालन करणे बंधनकारक असून नागरिकांनी या नियमांचे पालन करावे. महत्वाच्या कामाव्यतिरिक्त जनतेने घराबाहेर पडू नये. तसेच उद्या दि.२० मे पासून ते २२ मे पर्यंत अमळनेर तालुक्यात पुन्हा तीन दिवस जनता कर्फ्यु पाळण्यात येणार आहे.यास जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन तहसिलदार मिलिंद वाघ यांनी केले आहे.
-----------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.