कोरोना रोखण्यासाठी सरसावल्या " त्या " दोघी लोकप्रतिनिधींचे सहकार्य, नियोजन व परिश्रमांतून प्रशासनात साधला समन्वय उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे व नपाच्या मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक

------------------------------------------------------------------------
- * जाहीरात * -
-------------------------------------------------------------------------------
अमळनेर -
  कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशभर लॉकडाऊन जाहीर केले आहे. दि.२२ मार्चपासून सुरू झालेले लॉकडाऊन अद्यापही सुरूच आहे. अमळनेर तालुक्यात  कोरोना बाधित रूग्ण आढळून आल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लोकप्रतिनिधी व प्रशासनाने जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन केले होते. नागरिकांनी त्यास चांगला प्रतिसाद दिला. रूग्णांची संख्या वाढत असल्याने सर्व प्रशासकीय यंत्रणा तणावाच्या वातावरणात असतांनाही स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यात समन्वय राखत कोरोना रोखण्यासाठी धडपड करणा-या अमळनेरच्या उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे व नपाच्या मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड या दोघींच्या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. 
कार्यालयीन कामाचे नियोजन
     या लॉकडाऊनच्या काळात कोरोना प्रादुर्भावामुळे निर्माण होणा-या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दररोज होणा-या बैठका,कर्मचारी वर्गाचे नियोजन,दैनंदिन येत असलेल्या अडचणी व त्या सोडविण्यासाठी करावयाची कार्यवाही,वरिष्ठांना माहिती देणे व त्यांच्या सुचनेनुसार कर्मचारी वर्गाच्या कामाचे स्वरूप ठरविणे हे नित्याचे काम करण्यासह लॉकडाऊनचे उल्लंघन होऊ नये यासाठी त्या -त्या विभागाच्या अधिकारी वर्गाशी समन्वय साधून उपाय योजना करण्यात येत आहेत. यासाठी या दोन्ही महिला अधिकारी परिश्रमपूर्वक नियोजन करीत आहेत. अमळनेर तालुक्यात कोरोनाला कोणत्याहीपरिस्थितीत रोखण्याचा संकल्प उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे व नपाच्या मुख्याधिकारी डॉ.विद्यागायकवाड  या दोघींनी केल्याचे त्यांच्या कामाचा धडाका पाहिला तर दिसून येते. 

कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड
        या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात अमळनेर नगर परिषदेत डॉ.विद्या गायकवाड यांची बदली झाली. त्यांनी आपल्या कार्यपद्धतीची छाप अल्पावधीतच नपा प्रशासनावर पाडली. खरं म्हणजे आपली लहान मुले व परिवारापासून लांब राहून आपले   कर्तव्य पार पाडतांना मनाची होणारी ओढाताण लक्षात घेण्यासारखी आहे. मात्र केवळ कर्तव्य भावनेतून डॉ.गायकवाड अमळनेर नगर परिषदेत कर्तव्य बजावत आहेत. त्यांचे पती डॉ. किशोर सुरवासे हे परभणी येथील शासकीय रुग्णालयात उच्च पदावर आहेत. ते देखील त्या ठिकाणी रुग्ण सेवा बजावत आहेत.परिवार व मुले सुमारे  ३५० किलोमीटर लांब अंतरावर   आहेत. तरी देखील त्यांच्या कामाची जिद्द फार मोठी आहे. सकाळी पाच वाजेपासून ते रात्री उशिरापर्यंत त्या आपल्या सहकारी अधिकारी व कर्मचारी यांच्या समवेत आपले कार्य करीत असतात. मध्येच वेळ मिळाला की मुलांशी मोबाईल व्हीडीओ कॉलवर बोलणे होते आणि फोन झाला की लागलीच डॉ.विद्या गायकवाड या पुन्हा आपल्या कामात व्यस्त होतात. 

कार्यक्षम उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे
          अमळनेरच्या उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांच्या कामाचा धडाका नक्कीच  वाखाणण्याजोगा आहे. 
अमळनेर व चोपडा या दोन तालुक्यांचे त्यांचे कार्यक्षेत्र आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने त्यांची इंन्सीडंट कमांडर म्हणून नियुक्ती केली आहे. या परिस्थितीत उपाय योजना ठरविण्यासाठी लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्यात समन्वय साधून अतिशय प्रभावी यंत्रणा त्या राबवत आहेत. आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत शहरात फिरून कोरोनाबाबत लोकांमध्ये जागृती देखील निर्माण करीत आहेत. ग्रामीण भागातील परिस्थितीवर महसूल कर्मचारी, पोलीस प्रशासन,पोलीस पाटील, पंचायत समिती यांच्या माध्यमातून त्यांचे लक्ष असते. वेळप्रसंगी त्या गावात जाऊन प्रश्न सोडवायचा त्यांचा प्रयत्न असतो. 
कोरोनाची साथ सुरूझाल्यानंतर लॉकडाऊन व संचारबंदी लागू करण्यात आली. या संकटकाळात आपल्या विभागासह इतर विभागांना  सोबत घेऊन कामाचे काटेकोरपणे नियोजन करावे लागते. अशा परिस्थितीत उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे व नपाच्या मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड या लोकप्रतिनिधी व प्रशासन यांची योग्य सांगड घालत आहेत. आ.अनिल पाटील,स्मिताताई वाघ,मा.आ.कृषीभुषण साहेबराव पाटील,नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, सर्व नगरसेवक व इतर लोकप्रतिनिधी या सर्वांना विश्वासात घेऊन उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे व  मुख्याधिकारी डॉ.गायकवाड या शहर व तालुक्यासाठी महत्वाचे  कार्य सहकारी अधिकारी व कर्मचारी वर्गाच्या सहकार्याने करीत आहेत. शहरात जंतुनाशक फवारणी करण्यात आली,
नागरिकांनी घरातच थांबावे विनाकारण रस्त्यावर फिरणे टाळावे,सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे,घाबरून न जाता आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी असे जनतेचे प्रबोधन करणे,शहरातील ज्या भागात कोरोना रुग्ण आढळले तो भाग पूर्ण बंद करण्यात येऊन कॅन्टोनमेंट झोन घोषित करण्यातआला आहे, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जीवनावश्यक वस्तूंचा घरपोच पुरवठा या सारखी अनेक कार्य या दोन्ही महिला अधिका-यांच्या माध्यमातून सुरू आहेत.
      आज तर अमळनेर रेड झोनमध्ये आहे. रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांनी प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन केले तर कोरोना रोखणे शक्य होणार आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यात समन्वय साधून प्रभावी उपाय योजना करणा-या या दोन्ही अधिका-याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
-----------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.