अमळनेर हेडलाइन्स पोहोचला दुबईत अमळनेर हेडलाइन्सच्या बातमीचा सकारात्मक परिणाम अमळनेरच्या आठवणी घेऊन दुबईत नोकरी करणा-या दाऊद पिंजारीची दानशुरता सुभाष चौक रिक्षा युनियनच्या सर्व सभासदांना दिला एक महिन्याचा किराणा

Wednesday, May 27, 2020

/ by Amalner Headlines

अमळनेर - 
तालुक्यात कोरोना आजाराचे रूग्ण मोठ्या प्रमाणावर वाढल्याने स्थानिक पातळीवर जनता कर्फ्युपाळण्यात आला. दोन महिन्यापासून रिक्षा व्यवसाय बंद आहे. आपल्या सामान्य कुटुंबातील सभासदांची अडचण लक्षात घेऊन सुभाष चौक रिक्षा युनियनच्या पदाधिकारी व सभासदांनी आपण दरमहा यथाशक्ती जमा करीत असलेल्या आपत्कालीन स्वनिधीतून सर्व सभासदांना जीवनावश्यक किराणा वाटप करण्यात केला. या उपक्रमाची  अमळनेर हेडलाइन्समध्ये आलेली बातमी मुळचा अमळनेर येथील व सध्या दुबई येथे ड्रायव्हर म्हणून नोकरीत असलेल्या दाऊद छन्नू पिंजारी या तरूणाने वाचलीआणि त्याने या बिकट परिस्थितीत आपल्या जुन्या मित्रांना मदत करण्याची इच्छा युनियनचे अध्यक्ष किशोर पाटील यांच्याकडे व्यक्त केली. त्यानुसार त्याने ६५ हजार रुपये तातडीने पाठविले. त्या रक्कमेतून प्रत्येक सभासदास एक हजार रूपयांचा किराणा कालच घरपोच देण्यात आला.
दाऊद स्वतः रिक्षा चालक
     अमळनेर येथील तांबेपूरा येथे आपल्या आजी-आजोबा व परिवारासह रहाणारा दाऊद छन्नू पिंजारी हा एक मेहनती तरूण. रिक्षा चालवत असतांना तो चारचाकी वाहनही चालवायला शिकला.मग तो रिक्षा व चारचाकी वाहन चालवून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत असे. सुमारे १० वर्ष तो सुभाष चौकात रिक्षा व्यवसाय करीत होता. मागील ३-४ वर्षापासून तो दुबई येथे ड्रायव्हर म्हणून नोकरी करीत आहे.तेथे असला तरी मोबाइलच्या माध्यमातून तो आपल्या जुन्या मित्रांच्या संपर्कात आहेच.  
बातमी वाचून मिळाली प्रेरणा
 
सुभाष चौक रिक्षा युनियनने  सभासदांसाठी राबविलेल्या उपक्रमाची अमळनेर हेडलाइन्सने प्रसिद्ध केलेली बातमी नातेवाईक व मित्र परिवारामार्फत त्याच्या पर्यंत पोहोचली. सुमारे दोन महिन्यापासून व्यवसाय बंद असल्याने येथील परिस्थितीची कल्पना नजरेसमोर ठेवून दाऊद याने आपला मित्र व युनियन अध्यक्ष किशोर आनंदा पाटील यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधाला व अशा बिकट परिस्थितीची मला जाणीव आहे. मला आपल्या मित्रांना मदत करण्याची इच्छा आहे असे सांगितले. त्यानुसार त्याने सर्वांना १ हजार रुपये प्रमाणे एकूण ६५ हजार रुपये मदत तातडीने किशोर पाटील यांच्या बॅंक खात्यात जमा केली. या रक्कमेतून प्रत्येक सभासदास जीवनावश्यक किराणा वस्तूंचे वाटप घरपोच करण्यात आले. दाऊद छन्नू पिंजारी याने आठवणीने केलेल्या मदतीबद्दल रिक्षा युनियनच्या सभासदांनी त्याचे आभार मानले आहेत.या उपक्रमासाठी अध्यक्ष किशोर आनंदा पाटील, उपाध्यक्ष आनंदा वसंत पाटील, खजिनदार कृष्णा देविदास पाटील आदींनी परिश्रम घेतले. 
परिस्थितीची जाणीव असल्याने मदत
      मी स्वतः गरीब कुटुंबातील आहे.अमळनेर येथे असतांना मला व माझ्या परिवारास अशा अडचणी येत होत्या. मला रिक्षा युनियनच्या सभासदांनी वेळोवेळी मदत केली. परिश्रम घेऊन व संधी मिळाल्यामुळे मी आता दुबई येथे नोकरीत आहे. अशा संकटकाळात मित्रांना मदत करणे कर्तव्य आहे. अमळनेर हेडलाइन्सच्या बातमीमुळे प्रेरणा मिळाली. मदत करण्याचे भाग्य लाभले याचे समाधान आहे.
       *-दाऊद छन्नू पिंजारी,*
                          दुबई 

   आमच्या सुभाष चौक रिक्षा युनियनचा जुना सहकारी दाऊद पिंजारी याने या महत्वाच्या वेळेत केलेली मदत अनमोल आहे. आमच्या कुटुंबाची जीवनावश्यक  गरज यामुळे पूर्ण करू शकलो. आम्ही सर्वजण दाऊदचे आभारी आहोत. 

  *-किशोर पाटील,*  अध्यक्ष  
       सुभाष चौक रिक्षा युनियन

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines