जळगावं जिल्हा रुग्णालयाच्या कोविड सेंटरचा भोंगळ कारभार थांबवा दोषींवर कडक कार्यवाहीची डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषदेची मागणी

-------------------------------------------------------------------------
        - * जाहीरात * -
---------------------------------------------------------------------------
अमळनेर - जळगाव येथील कोविड रुग्णालयात अतिशय भोंगळ कारभार सुरु असून त्याचा रूग्णांच्या आरोग्यावर परिणाम दिसून येत आहे. काही रूग्णांच्या  मृत्यूची घटनादेखील घडल्या आहेत. हा भोंगळ कारभार थांबवा व दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषदेने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचेकडे केली आहे. 
उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांना दिले निवेदन
                येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषदेतर्फे राज्याचेआरोग्य मंत्री राजेश टोपे यांना अमळनेर प्रांताधिकारी सीमा अहिरे यांच्याद्वारे जळगावं जिल्हा रुग्णालयाच्या कोविड रुग्णालयातील भोंगळ कारभार थांबवून दोषींवर कडक कार्यवाही करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले.
विविध मुद्दयांचा उहापोह
       सदर निवेदनात जळगांव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा वाढता आलेख थांबत नाही. तसेच जिल्ह्यातील प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस पावले उचलतांनाही दिसत नाही. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याऐवजी मृत्युमुखी पडत आहेत. देशात कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण जळगावचे सर्वाधिक आहे. जळगांव जिल्हा रुग्णालयात सोयी-सुविधांची कमतरता आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांचा भोंगळ कारभार अनेकदा चव्हाट्यावर आला आहे. उदा.जिल्हा रुग्णालयातील कोरोना रुग्णाचे अहवाल गायब होणे, कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण हरवल्याची नातेवाइकांची तक्रार पोलीसांत दाखल होणे, उपचार घेण्यासाठी दाखल झालेल्या रुग्णांना ऑक्सिजन वेळेवर न मिळणे,नातेवाईकांना रुग्णाच्या जवळच राहण्याची सक्ती करणे, तसेच मृत रुग्णाला किट घालण्याचे काम नातेवाइकांना सांगणे, मात्र हे करत असतांना कोणत्याच प्रकारचे सुरक्षा साधन न पूरविणे असे प्रकार सर्रासपणे होतांना दिसत आहेत. रुग्णांची योग्य प्रकारे काळजी न घेतल्याने रुणांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नातेवाईकांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सरकारने या वर गंभीरपणे विचार करावा व दोषींवर कडक कार्यवाही करावी अशी भावना व्यक्त होतांना दिसत आहे. 
गंभीर प्रकाराकडे वेधले लक्ष
          तसेच सिव्हिल हॉस्पिटल जळगावच्या भोंगळ कारभार  व दुर्लक्षामुळे ऑक्सिजन बंद ठेवल्याने दि. ८ जून रोजी रात्री   अमळनेर येथील रविंद्र ओंकार बिऱ्हाडे या कोरोना संशयित रुग्णाचा रात्री १ वाजता मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकानीं केला असून दोषींवर त्वरित कडक कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. यापूर्वीही अमळनेरातील कामगार नेते रामभाऊ संदानशिव,देविदास बिऱ्हाडे,रुपसिंग पारे आदींच्या मृत्यूला जिल्हा रुग्णालयातील प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप संबंधित रूग्णांचे नातेवाईक करीत आहेत.
कडक कारवाई करा
     तरी महोदयांनी वरील बाबी लक्षात घेऊन तात्काळ चौकशी करून दोषी असलेल्या अधिकारी
- कर्मचाऱ्यांवर कडक कार्यवाही करून रुग्णांना योग्य सुविधा उपलब्ध करून द्यावी,अन्यथा सरकार विरोधात रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करण्यात येईल आणि याची सर्वस्व जबाबदारी ही शासनाची राहील याची नोंद घ्यावी अश्या आशयाची मागणी निवेदनात  करण्यात आली आहे.

सदर निवेदनावर परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.विजय वाघमारे, प्रा.हर्षवर्धन जाधव,नगरसेवक नरेंद्र संदांनशीव,प्रा.राहूल निकम, प्रा.विजय गाढे, प्रा.भुसनर,प्रा. सुनिल वाघमारे,सोमचंद संदांनशीव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
-------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.