कोरोना आजाराच्या वाढत्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य पथकाची अमळनेरला भेट रूग्ण संपर्कातील घटकांचे स्वॅब घ्या,संशयितांचे विलगीकरण करण्याच्या दिल्या सुचना प्रशासनाच्या कामाबद्दल पथक समाधानी - उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे

-----------------------------------------------------------------------
            - * जाहीरात * -
--------------------------------------------------------------------------
अमळनेर -
जळगाव जिल्ह्यातील कोरोना आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रूग्ण संख्या मोठ्या प्रमाणात आढळून आली आहे. दिवसेंदिवस रूग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाने जिल्ह्यात पाहणी दौरा सुरू केला आहे. आज हे केंद्रीय पथक अमळनेर शहरात आले होते. या पथकाने कोविड सेंटर,कॅन्टोनमेंट झोन व इतर संबंधित ठिकाणी भेटी दिल्या. यावेळी पथकासोबत जिल्ह्यात नव्यानेच बदलून आलेले जिल्हाधिकारी अभिजित राऊत व स्थानिक अधिकारी उपस्थित होते.
      जिल्ह्यातील कोरोनाच्या भयावह परिस्थिती बाबत खा.रक्षाताई खडसे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे तक्रार केली होती. त्यामुळे शासनाने द्विसदस्यीय पथक जिल्ह्यात आढावा घेण्यासाठी पाठवले आहे.या पथकात केंद्रीय आरोग्य समितीचे सदस्य डॉ.अरविंद अलोने व सार्वजनिक आरोग्य सल्लागार डॉ.एस.डी.खापर्डे यांचा समावेश आहे. अमळनेर  शहर व तालुक्यातील रूग्ण संख्या कासवगतीने वाढत आहे. त्यामुळे या पथकाने आज येथे भेट देऊन पाहणी केली व विविध सुचना केल्या. 
       प्रताप महाविद्यालयात असलेले कोविड सेंटर,ग्रामीण रूग्णालय, शहरातील कॅन्टोनमेंट झोन येथे भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेतली. शिव कॉलनी भागात भेटीप्रसंगी तेथील स्थानिक रहिवासी व भाजपा शहराध्यक्ष उमेश वाल्हे यांनी या भागात रूग्ण आढळून आल्यानंतरही प्रशासनाने योग्य ती काळजी घेतली नसल्याची तक्रार केली. यावर तातडीने उपाययोजना करावी असे आदेश पथकातील सदस्यांनी प्रशासनास दिले.यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्यासह स्थानिक अधिकारी उपस्थित होते.
पथक समाधानी- प्रांताधिकारी सीमा अहिरे
       अमळनेर तालुक्यातील रूग्ण संख्या वाढलेली आहे. सध्याचे वातावरण पहाता आगामी काळात कदाचित रूग्ण संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने तयारीत रहायला हवे. रूग्णांचा मृत्यू दर अधिक आहे.जेष्ठ नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. रूग्ण बरे होण्याची टक्केवारी चांगली आहे. असे सांगून स्थानिक पातळीवर अधिकारी व आरोग्य विभागाचे काम समाधानकारक असल्याचे पथकाने सांगितले. तसेच रूग्णांच्या संपर्कातील अधिकाधिक घटकांचे स्वॅब घ्या,संशयित रूग्ण आढळून आल्यास तातडीने विलगीकरण करा.संख्या वाढली तरी घाबरून जावू नका,जेष्ठ नागरिक रूग्णांची काळजी घ्यावी अशा सुचना पथकाने केल्याचे उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. यावेळी तहसिलदार मिलिंद वाघ,नपाच्या मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड,प्रशासन अधिकारी संजय चौधरी यांची उपस्थिती होती.
----------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.