अमळनेरात आज पुन्हा एक दिवस जनता कर्फ्यु , कडकडीत बंद पाळण्याचे प्रशासनाचे आवाहन अचानक घेतलेल्या निर्णयाने जनतेत नाराजीचा सूर

----------------------------------------------------------------------
          - * जाहीरात * -
      सेल.        कुलर सेल.       सेल.
----------------------------------------------------------------------
अमळनेर -
  अमळनेर तालुक्यातील ग्रामीण भाग व  शेजारील तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे.दिवसेंदिवस रूग्ण संख्येत वाढ होत आहे. या भिषण परिस्थितीत देखील नागरिक निष्काळजीपणे वागून नियमांचे उल्लंघन करीत असल्याने पुन्हा एकदा आज दि.२२ जून रोजी प्रशासनाने एक दिवसाचा जनता कर्फ्यु पाळण्याचा निर्णय घेतला आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. पण कोणतीही पुर्व सुचना नसतांना अचानक घोषित केलेल्या या जनता कर्फ्युबद्दल जनतेत नाराजी व्यक्त होत आहे. हा एक प्रकारे व्यापारी,अन्य व्यावसायिक व जनतेला वेठीस धरण्याचा प्रकार असल्याची टीका जनतेतून केली जात आहे. 
अत्यावश्यक सेवा सुरू,अन्य दुकाने बंद-जनतेत संभ्रम
         आज दि.२२ जून सोमवार रोजी नेहमी प्रमाणे होणारा आठवडे बाजार संभाव्य गर्दीचा अंदाज घेऊन बंद ठेवण्यात येणार आहे. संपूर्ण शहरात कडकडीत बंद पाळण्यात यावा असे आवाहन करण्यात आले आहे. ऑडीओ क्लिपमधील आवाहनात जनता कर्फ्यु काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने व सेवा बंद ठेवावीत असे आवाहन करण्यात आले आहे.  जनतेने स्वयंशिस्त पाळावी व महत्वाच्या कामा व्यतिरिक्त घराबाहेर पडू नये. प्रशासनाने घेतलेला हा निर्णय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी घेतला आहे असेही नमुद केले आहे. पण तहसिलदार मिलिंद वाघ यांनी जारी केलेल्या पत्रकात मात्र आठवडे बाजार बंद ठेवण्यात येणार असल्याचा उल्लेख व इतर जुजबी सुचना आहेत. मग जनता कर्फ्यु आहे की नाही ?, अन्य व्यावसायिकांनी आपली दुकाने उघडायची का नाही ? असा संभ्रम प्रशासनाने उशिरा घोषित केलेल्या निर्णयामूळे निर्माण झाला होता. यावर सर्वच समाज  घटकातून माध्यमातील व्यक्तींकडे विचारणा सुरू होती. 
जनतेचा निष्काळजीपणा धोकादायक
            अमळनेर येथील कोरोना बाधित रुग्णांची संख्या २६१ वर पोहोचली असली तरीनागरिकांना 
त्याचे गांभीर्य अद्यापही नसल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे. आरोग्य विभाग व प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन होतांना दिसत नाही. क्षुल्लक कामांसाठी दररोज बाजारात नेहमी सारखीच गर्दी होत आहे.सोशल डिस्टन्सींग, मास्कचा व सॅनिटायजरचा वापर या गोष्टी नावापुरत्या शिल्लक असल्याचे दिसते. लॉकडाऊनच्या कालावधीत रूग्ण संख्या १०० पेक्षा अधिक झाल्यानंतर नागरिकांनी काही काळ भितीने नियमांचे पालन केले. त्यामुळे नंतरच्या काळात रूग्ण संख्या झपाट्याने कमी झाली. पण लॉकडाऊनच्या अखेरच्या टप्प्यात  काही निर्बंध शिथील करण्यात आले. त्यानुसार आपल्याकडे दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली. तर त्यानंतर अनलॉक - १ सुरू झाले. पण या काळातही मात्र नियमांचे उल्लंघन मोठ्या प्रमाणावर होतांना दिसत आहे. शहरातील सुज्ञ नागरिकही सोशल मिडीयावर या बाबत चिंता व्यक्त करत आहेत. अमळनेर हेडलाइन्सने देखील यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले होते. रूग्ण संख्या पुन्हा कासवगतीने वाढत आहे. प्रशासनातील समन्वयाचा अभाव हे देखील रूग्ण संख्या वाढण्याचे कारण आहे अशी ओरड नागरिकांत होत आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसने याबद्दल उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांच्या विरोधात आरोप करून कारवाईची मागणी केली आहे. असे का घडत आहे याचा प्रशासनाने निश्चितच विचार करण्याची गरज आहे. 
 आवाहन 
        अमळनेरकर नागरिकांनी दि.२२ जून रोजी घोषित करण्यात आलेल्या जनता कर्फ्युचे पालन करावे व कडकडीत बंद पाळण्यात यावा असे आवाहन लोकप्रतिनिधी व प्रशासनाने केले आहे.
-------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.