----------------------------------------------------------------------
अमळनेर - कमी होत असलेली कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा वाढायला सुरुवात झाल्याने प्रशासन पुन्हा अलर्ट झाले आहे. घराबाहेर पडतांना किंवा सार्वजनिक ठिकाणी वावरतांना मास्क किंवा रूमालाचा वापर करावा व सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाने केले. पण जनता या आवाहनाला खरंच गांभीर्याने घेत आहे का ? हा प्रश्न सूज्ञ नागरिकांना विचार करायला भाग पाडत आहे. नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कारवाई या आदेशाची अंमलबजावणीच होतांना दिसत नाही.शासनाचे आवाहन - जनतेचे गांभीर्य
अमळनेर तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होत असतांना तालुका कोरोनामुक्त होईलच याची सर्वांनाच खात्री वाटू लागली होती. पण बदलत्या वातावरणामुळे कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते अशी शक्यता व्यक्त केली जात होती. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन शासन - प्रशासनाने केले. पण नागरिकांनी याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले असल्याचे बाजारपेठ, बस स्टँड व इतर सार्वजनिक ठिकाणी वावरतांना दिसून येत आहे. मास्क किंवा रूमालाचा वापर व सोशल डिस्टन्सींग या नियमांना अक्षरशः धाब्यावर बसवले आहे. रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे बिनधास्त आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई होऊ शकते याची पर्वाही नागरिकांना वाटत नाही.याबाबत कुणालाच गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.
रूग्ण संख्येची कासवगती
अमळनेर तालुक्यात रूग्ण संख्या दररोज १ किंवा २ अशी वाढत असली तरी ही कासवगती आहे.आता सुमारे २५ रुग्ण उपचार घेत आहेत. ही संख्या कमी करण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. अन्यथा आजार नियंत्रीत करणे त्रासदायक ठरू शकते. शासन - प्रशासनाने नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे.तरच शुन्य रूग्ण संख्या हे ध्येय शक्य होणार आहे.
नियमांची कठोर अंमलबजावणी हवीच
लॉकडाऊनमध्ये ज्या प्रमाणे नागरिकांनी नियमांचे पालन केले,त्याप्रमाणे आता देखील नियम पाळणे महत्त्वाचे आहे याची जाणीव होणे गरजेचे आहे. घराबाहेर पडतांना मास्क वापरला पाहिजे,सोशल डिस्टन्सींगचे पालन केले पाहिजे,रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, काही काम नसतांना विनाकारण फिरू नये या आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त नियमांबाबत जागरूकता निर्माण झाली पाहिजे.आज तर अनेक जण विना मास्क फ़िरतांना दिसून येत आहेत.तसेच शासनानेही या नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कारवाई केली पाहिजे. वाढत्या रूग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर शेजारच्या पारोळा व चोपडा येथे आठवड्यात एक दिवस जनता कर्फ्यु पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरात तर नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे तरच कोरोनाला रोखणे शक्य होणार आहे.
No comments
Post a Comment