नवीन पोलीस वसाहतीत खोलीच्या सिलींगचे प्लास्टर कोसळले,सुदैवाने दोन्ही बालके बचावली चार महिन्यापूर्वीच झाले होते उद्घाटन

Saturday, May 1, 2021

/ by Amalner Headlines
--------------------------------------------------------------------
                     - * जाहीरात * -
-------------------------------------------------------------------
अमळनेर -  येथील ढेकू सीम रोडवरील पोलीस स्टेशनच्या जवळ बांधण्यात आलेल्या पोलीस वसाहतीतील एका घराचे सिलींग आज दि. १ मे रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास अचानक कोसळले. या दुर्घटनेत साडेतीन वर्षाची दोन मुले सुदैवाने बचावली व मोठा अनर्थ टळला. अगदी चार महिन्यांपूर्वीच या वसाहतीचे उदघाटन झाले आहे. 
      अमळनेर शहरातील ढेकूसीम रोडवर असलेल्या पोलीस स्टेशन शेजारीच पोलीस बांधवांसाठी नवीन वसाहत बांधण्यात आली आहे. चार महिन्यांपूर्वी राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते या वसाहतीचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर पोलीस कर्मचारी तेथे राहायला गेले होते.
कशी घडली दुर्घटना
           आज दि.१ मे रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास "बोरी" नावाच्या इमारतीत खोली नंबर तीनमध्ये राहणारे पोलीस कर्मचारी सचिन भागवत पाटील हे बाहेर गेलेले होते. त्यांच्या पत्नीने आपली साडेतीन वर्षांची जुळी मुले पंख्याखाली गादी टाकून झोपवले होते.  छताच्या प्लास्टरचा तुकडा अचानक खाली पडला आणि लहान बाळांची आई सावध झाली. तिने क्षणाचाही विलंब न करता, तत्काळ गादी ओढून बाजूला घेतली. तेवढ्यात काही वेळातच प्लास्टरचा मोठा भाग खाली कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत दोन्ही बाळ बचावले.
       सदर घटनेबाबत पोलीस कर्मचा-यांनी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना तात्काळ कळविले.
घटना गंभीर,चौकशीची मागणी
         बांधकाम पूर्ण होऊन ४- ५ महिनेच झाले असतांना एवढ्या कमी कालावधीत इमारतीच्या सिलींगचा भाग कोसळणे दुर्दैवी तर आहेच पण बांधकामाच्या गुणवत्तेबद्दल शंका निर्माण होण्यासारखे आहे. या बांधकामाची तात्काळ सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. जर दुर्दैवाने दुर्घटना घडली असती मोठे अघटीत घडले असते. सुदैवाने जिवीतहानी झाली नाही हे महत्वाचे आहे. इमारतीचे बांधकाम नजिकच्या काळातील असले तरी या घटनेत दोषी असल्यास ठेकेदारावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines