'महसुल' ला आली जाग
तालुक्यात राजरोसपणे सुरु असलेल्या अवैध वाळू उपसा प्रकरणी पोलीसांनी आठवड्यात दोनदा धाडसी कारवाई केली. याबद्दल पोलीसांचे अभिनंदन होत असतानांच महसूल विभागाच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. वाळू चोरीस आळा घालणे हे महसुल विभागाचे काम आहे. पण याबाबत पोलीस विभाग अॅक्शन मोडमध्ये दिसून आला. जळोद व हिंगोणा येथे खब-यांना चकवून बेधडक कारवाई करण्यात आली. मग जे पोलीसांना दिसते ते महसुल विभागास दिसत नाही का ? असा प्रश्न चर्चिला जात होता. महसुल विभागाने काल मध्यरात्री गंगापूरी येथे छापा टाकला.
छापा,धमकी आणि जीवघेणा हल्ला
अमळनेरच्या उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांनी वाळू चोरीवर कारवाई करण्याबाबत कर्मचारी वर्गास आदेश दिले. त्यानुसार तहसिलदार मिलिंदकुमार वाघ व मंडल अधिकारी,तलाठी असे पथक गंगापूरी परिसरात कारवाईसाठी गेले. त्याठिकाणी ६ कर्मचा-यांचे एक पथक नदी पात्रात पोहोचले असता त्यांना ६ ट्रॅक्टरमध्ये वाळू भरत असल्याचे दिसून आले. यावेळी ट्रॅक्टर मालक व चालक यांनी महसुलचे कर्मचारी तलाठी गणेश महाजन,तिलेश पवार,सतिष शिंदे या तिघांना धक्काबुक्की व मारहाण केली. या कर्मचा-यांनी ट्रॅक्टरवर बसून चालकास ट्रॅक्टर अमळनेर तहसिल कार्यालय येथे घेण्याचे सांगितले असता मालकांनी तलाठी गणेश महाजन यांना ट्रॅक्टरखाली दाबून टाकू अशी धमकी दिली व चालकास वाहन सुरू करून यांना ट्रॉलीखाली दाब असे सांगितले.चालकानेही दोन वेळेस ट्रॅक्टर मागे पुढे करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी अन्य कर्मचा-यांनी वरिष्ठांना घटना कळविली. यादरम्यान वाळू भरलेले तीन ट्रॅक्टर पळून जाण्यात यशस्वी झाले.
गुन्हा दाखल
घटनास्थळी आढळून आलेले व वाळू भरलेले तीन ट्रॅक्टर व मालक,चालक जगन पावरा,बुधगाव,महेश ज्ञानेश्वर पवार, अतुल ज्ञानेश्वर पवार,अनवर्दे,धिरज प्रभाकर धनगर,बुधगाव व अन्य दोन चालक यांच्याविरुद्ध अमळनेर पोलीसात अवैध गौणखनिज चोरी करणे,संगनमताने संघटीतपणे शासकीय कर्मचा-यांना धक्काबुक्की,मारहाण,शिवीगाळ करणे व जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे,वाळू भरलेले तीन ट्रॅक्टर घेऊन पळ काढणे याबाबत सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्याच्या चारही बाजूस असलेल्या नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा व वाहतूक होत असल्याचे या घटनांमुळे निदर्शनास येत आहे. पर्यावरणाचा -हास होत असतांना या माफियांना आळा घालणे आवश्यक आहे. महसुल विभागाने वाळू माफियांवर कठोर कारवाई केली तरच या प्रकारांना पायबंद बसू शकतो.
No comments
Post a Comment