शैक्षणिक शुल्क व अन्य समस्येबाबत अभाविपचे 'प्रताप'च्या प्राचार्यांना निवेदन कोरोनामुळे पालकांच्या आर्थिक परिस्थितीवर विपरीत परिणाम - शासनाचे वेधले लक्ष

Friday, June 4, 2021

/ by Amalner Headlines
-----------------------------------------------------------------
                        - * जाहीरात * -
--------------------------------------------------------------------
अमळनेर -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली  परिस्थिती व त्याचा विपरीत परिणाम याबाबत शासनाने शैक्षणिक समस्यांबाबत योग्य निर्णय घ्यावा. महाविद्यालयांनी फी वाढ करू नये व फी भरण्यासाठी सवलत द्यावी आदी मागण्या येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखेच्या वतीने शासनाकडे करण्यात आल्या. मागण्यांचे निवेदन प्रताप महाविद्यालयांच्या प्राचार्यांमार्फत मुख्यमंत्री महोदयांना निवेदन देण्यात आले.
काय आहेत मागण्या
             अभाविपने विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक समस्यांबद्दल निवेदन दिले. देशभरात तसेच महाराष्ट्रामध्ये देखील कोविड १९ व म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, त्यामुळे ताळेबंदी ही सातत्याने केली जात आहे. यामुळे संपूर्ण जनजीवन व आर्थिक स्थिती विस्कळीत झालेली आहे याचा परिणाम पालकांच्या रोजगार व उत्पन्नावर झालेला आहे. त्यामुळे शाळा व महाविद्यालयांकडून आकारले जाणारे भरमसाठ शैक्षणिक शुल्क पालकवर्ग शाळा व महाविद्यालयांना देण्यास सक्षम नाही. कोविडमुळे सर्व शिक्षण ऑनलाइन पद्धतीने देण्यात येत असल्याने अनेक तांत्रिक समस्या देखील निर्माण झालेल्या आहेत. 
शाळा व सर्व अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांचे भरमसाठ असलेले शैक्षणिक शुल्क कमी करण्यात यावे व ज्या सुविधांचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतलेला नाहीये अशा सुविधांचे शुल्क शैक्षणिक शुल्कामध्ये आकारले जाऊ नये. उदा. सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा, जिमखाना, प्रयोगशाळा, इंटरनेट, महाविद्यालय विकास निधी, पार्किंग, ग्रंथालय शुल्क, इत्यादी. 
परिक्षा शुल्कात कपात करा
         परिक्षा ऑनलाईन पद्धतीने होत असतांना शुल्क हेऑफलाईन परीक्षा पद्धती प्रमाणेच आकारले जात आहे. त्याच बरोबरीने प्रोजेक्ट शुल्क ही मोठ्या प्रमाणात आकारले जात आहे. त्यामुळे परीक्षा शुल्कात देखील कपात करण्यात यावी अशी देखील मागणी केली. तसेच कोविडमुळे ज्या विद्यार्थ्यांच्या परिवारातील सदस्य कोविडमुळे दगावले असतील. अशा सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यासंदर्भात शासनाने निर्णय घ्यावा तसेच सर्व विद्यापीठांनी अशा विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना सुरू करून या अंतर्गत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करावे. अशा विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांना आवाहन
       अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अमळनेर शाखेच्या वतीने मुख्यमंत्री महोदयांना निवेदन देण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांना काही शैक्षणिक समस्या असल्यास संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
यांची होती उपस्थिती
                    यावेळी अभाविपचे अमळनेर शहरमंत्री व प्रदेश कार्यकारिणी सदस्य केशव पाटील, जिल्हा विद्यार्थिनी प्रमुख प्रगती काळे, हर्षदा बडगुजर,कृष्णा साळुंखे,रोहन शिंपी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines