अमळनेरच्या बाजारपेठेतुन भरदिवसा मोटरसायकलची चोरी पोलीसात गुन्हा दाखल,तपास जारी

अमळनेर -
शहरातील लुल्ला मार्केट परिसरातील सोमेश्वर शॉपिंग कॉम्प्लेक्स जवळून दि.२१ जून रोजी भरदिवसा दुपारच्या वेळेस होंडा युनिकॉन कंपनीची मोटरसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली. गजबजलेल्या वस्तीत सदर घटना घडल्याने व्यापारी बांधवात खळबळ उडाली आहे.
भरदिवसा झाली चोरी
     शहरात अतिशय मध्यवर्ती बाजारात लुल्ला मार्केट परिसरात सोमेश्वर शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये भरतकुमार पंजाबी यांचे ट्रेडींगचे दुकान आहे. दि.२१ जून रोजी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास त्यांनी त्यांच्या मालकीची होंडा युनिकॉन कंपनीची काळ्या रंगाची मोटरसायकल क्र. एम.एच.१९ बी.एस. ९५९९  आपल्या शॉपिंग सेंटर शेजारील बोळीत उभी केली होती. दुपारी ३ वाजेच्या सुमारास ते काही कामासाठी बाहेर जाण्यास निघाले व मोटरसायकल घेण्यास गेले असता त्याठिकाणी मोटरसायकल आढळून आली नाही. बराच वेळ पर्यंत शोध घेतला पण गाडी न सापडल्याने त्यांनी पोलीसात गुन्हा दाखल  केला आहे. गाडी मालक भरतकुमार मोटुमल पंजाबी यांच्या फिर्यादीवरून वरील क्रमांकाची अंदाजे ४५ हजार रुपये किंमतीची मोटरसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याबाबत भादंवि कलम ३७९ अन्वये फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास पो.कॉ.बापू साळुंखे हे करीत आहेत.
वाहने सुरक्षित ठेवा - आवाहन
       भरदिवसा बाजारातून मोटरसायकल चोरीला गेल्याने व्यापारी बांधवात चिंता व्यक्त केली जात आहे. मागील काही दिवसात वाहने चोरीच्या घटना वाढल्या आहेत. व्यापारी बांधवांनी आपल्या वाहनांना दुकानाजवळ पार्किंगला लावतांना हॅन्डल लॉक किंवा सुरक्षित राहील अशी साखळी नक्की लावावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.