महाराष्ट्र शासनाने पुन्हा लागू केले नवीन निर्बंध सोमवारपासून सर्व जिल्हे तिसऱ्या टप्प्याच्या वरच नवीन विषाणूचे रूग्ण आढळल्याने जिल्हा प्रशासनाने जारी केले नवीन निर्देश

------------------------------------------------------------------
                   - * जाहीरात * -
----------------------------------------------------------------
मुंबई जळगाव - महाराष्ट्रात हळूहळू कोरोना रूग्णांची संख्या  नियंत्रणात येत असली तरी नवीनच आढळून आलेल्या डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे चिंता वाढली आहे. देशात सर्वाधिक डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहे. ही स्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने नवी नियमावली जारी केली आहे. यानुसार राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसऱ्या गटाच्या वरच ठेवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजेच तिसऱ्या टप्प्यातील नियम संपूर्ण राज्यात सोमवारपासून लागू होणार आहेत. राज्यातील कोणताही जिल्हा तिसऱ्या टप्प्याच्या खाली असणार नाही. या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानेही नवीन निर्देश जारी केले आहेत.
सर्वच जिल्हे तिस-या टप्प्यावर
            राज्यात दि. ४ जून रोजी जाहीर केलेल्या नियमावलीनुसार ५ गटांमध्ये जिल्हे आणि महानगरपालिकांची विभागणी करण्यात आली होती. यामध्ये त्या जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सीचं प्रमाण विचारात घेऊन सर्वात कमी दर असणारे जिल्हे पहिल्या गटात यानुसार पाचव्या गटापर्यंत विभागणी करण्यात आली होती. त्यानुसार, या प्रत्येक गटानुसार निर्बंध अधिकाधिक कठोर होत गेले. मात्र, आज राज्य सरकारने जाहीर केलेल्या निर्णयानुसार आता पॉझिटिव्हिटी रेट किंवा बेड ऑक्युपन्सीचं प्रमाण कितीही कमी असलं, तरी राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगर पालिका पुढील आदेश येईपर्यंत या तिसऱ्या गटाच्या वरच असणार आहेत.
निर्बंध कमी करण्यासाठी जिल्हा स्तरावर आढावा
                आजच्या निर्देशांनुसार आता निर्बंध कमी करायचे असल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून दोन आठवड्यांच्या आकडेवारीचा आढावा घेतला जाईल. त्यानुसार निर्णय घेतले जातील. मात्र, निर्बंध वाढवायचे असल्यास दोन आठवड्यांच्या आकडेवारीची वाट पाहण्याची गरज नाही असं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे.
काय आहेत नवीन नियम
संचारबंदी - जमावबंदी
           जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या नियमानुसार सायंकाळी ५ वाजेपासून ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. वैद्यकीय  कामाशिवाय घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यासाठी अत्यावश्यक सेवा देणारे शासकीय कर्मचारी,नागरिक यांना सवलत देण्यात आली आहे. पण त्यांना आपले ओळखपत्र जवळ बाळगणे आवश्यक आहे. तसेच नागरिकांना सायंकाळी ५ वाजेच्या आत ५ पेक्षा अधिक व्यक्तींना एकाच ठिकाणी एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. यात पूर्वनियोजित कार्यक्रम,विवाह समारंभ,
अंत्यविधी या कार्यक्रमांना सूट देण्यात आली आहे.
काय असेल सुरू तर काय बंद
         अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने दुपारी ४ वाजेपर्यंत पर्यंत खुली राहतील. तसेच इतर दुकानेही दुपारी ४ वाजेपर्यंत पर्यंत खुले राहतील. पण शनिवार-रविवारी पूर्णपणे बंद असतील.

           मॉल, चित्रपटगृह पूर्णपणे बंद तर हॉटेल्सना दुपारी ४ वाजेपर्यंत पर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू राहण्याची परवानगी असेल,तर पार्सल सुविधा रात्री ९ वाजेपर्यंत सुरू ठेवता येईल.  परंतु शनिवार-रविवार फक्त पार्सल सेवा उपलब्ध असेल.

         जीम, सलून, स्पा ५० टक्के क्षमतेने दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. एसीचा वापर करू नये

हवेमधून पसरू शकणाऱ्या कोरोनाच्या प्रकारांना टाळण्यासाठी आस्थापनांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित आणि हवेशीर वातावरण ठेवण्याची सक्ती करावी.

टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीट या पद्धतीचा अवलंब करणे.मोठ्या प्रमाणावर आरटीपीसीआर चाचण्या करणे तसेच कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांवर प्रभावीपणे दंड आकारणे.

गर्दी करणारे किंवा होऊ शकणारे कोणतेही कार्यक्रम किंवा घटना टाळण्यात याव्यात.

लग्नाच्या हॉलला ५० टक्के क्षमतेने खुले राहण्यास परवानगी देण्यात येईल. कमाल १०० लोकांची उपस्थितीत राहण्यास परवानगी असेल. तर अंत्यसंस्कार विधीला २० लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी असेल.

लग्नसमारंभ, रेस्टॉरंट, मॉल्ससारख्या गर्दीच्या ठिकाणी भरारी पथकं नेमून तपासणी करावी. प्रत्येक नागरिकांकडून नियमांचे पालन सक्तीने करावे.

सार्वजनिक वाहतूक १०० टक्के क्षमतेने सुरू राहतील. उभ्याने प्रवास करता येणार नाही.

सरकारी कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू राहण्यास परवानगी तर खासगी कार्यालयांना परवानगी मिळाल्यास ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यात येतील.

चित्रीकरणाला बायो बबल वातावरणात परवानगी देण्यात आली आहे.

बांधकाम करण्यास परवानगी देण्यात आली आहे पण, मजुरांची दुपारी ४ वाजेनंतर ने - आण करण्यास मनाई करण्यात आली आहे. 

अशाप्रकारे नवीन निर्देश जारी करण्यात आले आहेत. स्थानिक पातळीवर पोलीस प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्था यांनी संयुक्तपणे कारवाई करावयाची आहे.
दंडात्मक कारवाईचे आदेश
       घराबाहेर पडतांना नागरिकांनी मास्क वापरावा,सॅनिटायजरचा वापर करावा व सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास कारवाई करण्यात येईल. अशावेळी ५०० रुपये इतका दंड वसूल करण्यात यावा असे आदेश जिल्हाधिकारी डॉ अभिजीत राऊत यांनी जारी केले आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.