अमळनेर - कोरोना महामारीत आपल्या भूमीतील रुग्णांसाठी काहीतरी योगदान देण्याची मनस्वी इच्छा असतांना अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाचे निवृत्त उपप्राचार्य ललित लक्ष्मीकांत मोमाया व सौ.स्नेहल मोमाया या सेवाभावी वृत्तीच्या दांपत्याने अमळनेर ग्रामिण रुग्णालयास ऑक्सिजन पुरवठ्याचे १९ हजार बिल स्वतः अदा करून सेवाभावी वृत्तीचे दर्शन घडविले.
प्रत्यक्षात अमळनेर येथे दुसऱ्या लाटेत कोरोनाचा रुद्रावतार झालेला असतांना तातडीची गरज म्हणून रुग्णालय प्रशासनाने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ३५ जम्बो सिलेंडरद्वारे रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा करून घेतला होता. त्यामुळे एकाच वेळी ग्रामीण रुग्णालय व इंदिरा भुवन असे दोन कोविड हेल्थ सेंटर चालवता येऊन शेकडो रुग्णांना जीवदान मिळाले. मात्र या ऑक्सिजन पुरवठ्याच्या रिफिलिंगचे बिल कसे अदा करावे असा प्रश्न रुग्णालय प्रशासनास पडला असतांना प्रा.ललित मोमाया यांनी स्वतःहून इच्छा व्यक्त केल्याने पुरवठादारास बिल अदा करणे शक्य झाले आहे. याबाबत ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.प्रकाश ताळे यांनी माहिती देतांना सांगितले की कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जळगाव जिल्ह्यात जवळपास ५० टक्केच्या वर ऑक्सिजनचा तुटवडा होता. त्यात अमळनेर येथे रुग्णसंख्या मोठी आणि ऑक्सिजनची आवश्यकता देखील अधिक असल्याने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी अन्न व औषध विभागाचे आयुक्त नाशिक यांच्या मार्फत अमळनेर ग्रामिण रुग्णालयाच्या कोविड हेल्थ सेंटरला ३५ जम्बो ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा करून घेतला होता. त्यामुळे एकाच वेळी दोन कोविड हेल्थ सेंटर सुरू झालीत. सदर सिलेंडर संपल्यानंतर जवळपास एक महिन्यापर्यंत पुन्हा पुन्हा रिफिलिंग करावी लागली. प्रत्यक्षात यासाठी निधीची तरतूद नसतांना डॉ.ताडे यांनी क्रेडिटवर हे सिलेंडर रिफिलिंग करून घेतले होते. दरम्यान प्रा. मोमाया यांनी दुसऱ्या लाटेत रुग्णांसाठी काहीतरी योगदान देण्याच्या भावनेतून ऑक्सिजन पुरवठ्याची माहिती घेऊन मदतीची इच्छाही व्यक्त केली होती. परंतु खाजगी व्यक्तीस ऑक्सिजन सिलेंडर भरून देण्यास त्यावेळी परवानगी नसल्याने त्यांचा नाईलाज झाला. अखेर कोणत्याही मार्गाने का असेना योगदान द्यायचेच ही इच्छा मनात असल्याने संबंधित ऑक्सिजन पुरवठादार एजन्सी कडून रुग्णालय प्रशासनास बिल प्राप्त झाल्याने सदरचे १८ हजार ७१२ रुपये बिल प्रा.मोमाया यांनी धनादेशाद्वारे अदा केले आहे.
सदर धनादेश प्रा.ललित मोमाया व सौ.स्नेहल मोमाया यांच्या हस्ते डॉ.ताडे यांनी स्वीकारून विशेष आभार व्यक्त केले. यावेळी साईश किरण पाटील व हिमांशू किरण पाटील उपस्थित होते.
