-----------------------------------------------------------------
अमळनेर - येथील जीवन ज्योती कॉलनीत गेल्या अनेक वर्षांपासून गटारींचा प्रश्न प्रलंबित असल्याने संतप्त नागरिकांनी प्रा. जयश्री दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली दि. २ जून रोजी नपा कार्यालयात धडक दिली. यावेळी प्रा. दाभाडे यांनी उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांच्या टेबलवर सांडपाण्याने भरलेल्या बादल्या ठेवल्या.
रहिवासी संतप्त का झाले ?
याबाबत सविस्तर माहिती अशी की,शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाजवळ जीवन ज्योती कॉलनी ही १९८७ पासून अस्तित्वात आहे.ही कॉलनी शहरातील मध्यवर्ती भागात असून सर्व नागरिक नियमितपणे कर भरणारे आहेत.ह्या कॉलनीतील सांड पाणी वाहून नेणाऱ्या गटारीचा प्रश्न हा गेल्या २० वर्षांपासून प्रलंबित असून वेळोवेळी अर्ज,विनंत्या,आंदोलने,उपोषण करूनही मार्ग निघत नाही. अनेक राजकीय नेते पुढारी अधिकारी येऊन गेले पण हा प्रश्न मार्गी लागला नाही. या संदर्भात या भागातील रहिवासी व सामाजिक कार्यकर्त्या प्रा.जयश्री दाभाडे यांनी दि.११ मे २०२१ रोजी लेखी निवेदन नगर परिषद प्रशासनास दिले होते व १०दिवसांत प्रश्न न सुटल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता.परंतु काल पर्यंत कोणतेही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने प्रा.जयश्री दाभाडे यांनी गटारीतील पाणी बादल्यांमध्ये घेत पायी चालत न. पा. कार्यालय गाठले आणि उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांच्या टेबलवर गटारीतील पाण्याच्या बादल्या ठेवत आंदोलन केले. यावेळी न. प. समोर नागरिक उपोषणास बसले होते.

यांची होती उपस्थिती
यावेळी हरीश जैन,आरती शाह,दक्षा संघ,प्रतीक भुतडा इ. कॉलनीतील नागरिक उपस्थित होते. तर मनोज पवार,अनिल पारधी,विजय साळुंके,पुनमचंद पारधी,राहुल बडगुजर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

