पोलीसांच्या बेधडक कारवाईने 'गुटखा किंग' चे धाबे दणाणले
------------------------------------------------------------------
अमळनेर - काल पुन्हा एकदा अमळनेर शहरात मोठ्या प्रमाणात गुटखा साठा जप्त करण्यात आला आहे. विक्रेत्याकडे घातलेल्या छाप्यात एकूण १ लाख ४६ हजाराचा मुद्देमाल आढळून आला असून एका आरोपीस अटक करण्यात आली असून आज न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अचानकपणे झालेल्या कारवाईमुळे गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. अशी झाली कारवाई
अमळनेरचे पोलीस निरीक्षक श्री जयपाल हिरे यांना गुटखा साठा असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी बंदोबस्तावरून परत येत असलेले पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे,राहुल लबडे, पो.ना.दिपक माळी,डॉ.शरद पाटील,पो.कॉ.रविंद्र पाटील,भटूसिंग तोमर,संजय पाटील,
सुनिल हटकर,मधुकर पाटील, म.पो.कॉ.नम्रता जरे यांना सदर माहितीची खात्री करण्यासाठी पाठविले. पोलीस पथकाने सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास तपासणी केली असता शहरातील शनिपेठ पैलाड भागातील संजय जगन्नाथ पाटील (वय४६) यांच्या घरात प्रतिबंधीत गुटखा, सुगंधी सुपारी व पान मसाला असा मुद्देमाल विक्री करण्याच्या उद्देशाने साठा करून ठेवल्याचे आढळून आले. पोलीसांनी केलेल्या तपासणीत महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला १ लाख ४६ हजाराचा गुटखा आढळून आला.सदर मुद्देमाल जप्त करण्यात असून संजय पाटील यास अटक करण्यात आली आहे.
आता निर्माण होईल कायद्याचा धाक
या कारवाईने गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी पदभार घेतल्यापासूनच अवैध धंदे करणा-यांवर कारवाईचा धडाका लावला आहे. या आधीही मोठ्या प्रमाणावर गुटखा साठा आढळून आला होता. त्यावेळी देखील प्रशासनाने कारवाई केली होती. तरीही गुटख्याचा व्यवसाय आटोक्यात आल्याचे दिसून येत नाही. अतिशय सराईतपणे व्यवसाय सुरू आहे. आता पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी गुटखा विक्रेत्यांच्या विरुद्ध कारवाईची आघाडी उघडल्याने अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होईल असे बोलले जात आहे.
गुन्हा दाखल - पोलीस कोठडी
सदर प्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला भादंवि कलम ३२८,२७२,२७३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस आज न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल लबडे करीत आहेत.
No comments
Post a Comment