न्यायालयाने दिली चार दिवसांची पोलीस कोठडी
--------------------------------------------------------------------
अमळनेर - मागील पंधरवाडयात एका वृध्द शेतक-याच्या खिशातील रक्कम बळजबरीने हिसकावून पळ काढणा-या आरोपीस अमळनेर पोलीसांनी शिंदखेडा येथे जाऊन शिताफीने अटक केली आहे. सदर आरोपीस न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.पोलीसांच्या कारवाईचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.कुठे घडली घटना
याबाबतची अधिक माहिती अशी की,शहरातील पैलाड भागातील रहिवासी अशोक गोविंदा पाटील (वय ६५) यांनी दि.१६ जुलै रोजी येथील अर्बन बॅंकेत सोने तारण ठेवून शेती कामासाठी सुमारे ५५ हजार रुपये कर्ज घेतले. सदर रक्कम आपल्या पॅंटच्या खिशात ठेवून ते बॅंकेच्या मागील बाजूस असलेल्या सार्वजनिक मुतारीत लघुशंकेसाठी गेले होते. तेथून निघून जात असतांना एका तरूणाने त्यांना मागील बाजूने धरले व बळजबरीने खिशातील रक्कम हिसकावून पळ काढला. सदर आरोपी पळत असतांना बॅंकेच्या सीसीटीव्ही कॅमे-यात दिसून आला. या घटनेची अमळनेर पोलीसात नोंद करण्यात आली व गुन्हा रजि.नं. ३०८/२०२१ नुसार भादंवि कलम ३९२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

कसा लागला तपास
या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासकामी व्हायरल करण्यात आले व आरोपीचा शोध घेण्यात येत होता. दि.३० जुलै रोजी हा तरूण शिंदखेडा येथील इमरान पठाण असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पो.कॉ. सुनिल हटकर,पो.ना.दिपक माळी,डॉ.शरद पाटील,रविंद्र पाटील यांना तपास कामी शिंदखेडा येथे पाठवले. त्यांनी शिताफीने आरोपी इमरान समशेर पठाण (वय ३०,रा. तेरा घर मोहल्ला,नगर पंचायत समोर,शिंदखेडा जि.धुळे) यास अमळनेर येथे आणले. सदर घटनेबाबत विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदर रक्कम मीच बळजबरीने हिसकावून नेली अशी गुन्ह्याची कबुली दिली. त्यामुळे आरोपीस अटक करण्यात आली.
आरोपीस पोलीस कोठडी
आरोपीस दि.३१ जुलै रोजी अमळनेर पोलीसांनी न्यायालयात हजर केले असता त्यास दि.३ ऑगस्ट २०२१ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अमळनेरचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे व पोलीसांनी केलेल्या या कारवाईचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.
No comments
Post a Comment