निर्धारित वेळेनंतरही दुकाने सुरू ठेवणा-या तीन दुकानांवर नपाची दंडात्मक कारवाई डेल्टा प्लसचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक

Sunday, July 4, 2021

/ by Amalner Headlines
नपा व पोलीसांच्या संयुक्त कारवाईने प्रशासनाचा उद्देश होईल सफल

महसुल व पोलीस विभागाचा नपाच्या पथकासोबत असहकार तर नाही❓
---------------------------------------------------------------------
                       - * जाहीरात * -
------------------------------------------------------------------
अमळनेर - कोरोना नंतर आलेल्या डेल्टा प्लस आजाराचे रूग्ण जळगाव जिल्ह्यात आढळून आल्याने प्रशासन सतर्क झाले. त्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने काही नियमावली जाहीर केली. त्यानुसार नियमांचे पालन करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. अमळनेर शहरात या नियमांचे उल्लंघन करणा-या दोन दुकानांवर नपाच्या पथकाने कारवाई केली आहे. तर आजाराचा संभाव्य धोका लक्षात घेता नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक असून त्याबाबत नागरिक व व्यापारी बांधवांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. नपा व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई केली तरच शासनाने ज्या उद्देशाने नियमावली लागू केली आहे तो उद्देश सफल होऊ शकतो. पण असे होतांना दिसत नाही असे खेदाने म्हणावे लागत आहे. महसुल व पोलीस विभागाचा नपाच्या पथकाशी असहकार तर नाही ? असा प्रश्न निर्माण होत आहे.
तीन दुकानांवर दंडात्मक कारवाई
प्रशासनाने सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. पण यावेळेनंतरही काही दुकानदार आपली दुकाने सुरू ठेवत असल्याचे दिसून येत आहे. असे दुकान सुरू ठेवणा-या राजस्थान स्वीट मार्ट व आशु ड्रेसेस या दोन दुकानांवर काल तर भरत अंडेवाले यांच्यावर आज दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
नियमांचे पालन आवश्यक
प्रशासनाने जारी केलेल्या आदेशांचे पालन नागरीक व व्यापारी बांधवांनी करणे आवश्यक आहे. दिवसा जमावबंदी व सायंकाळी ५ वाजेपासून सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी आदेश देण्यात आले आहेत. तरीही नागरिक मास्कचा वापर न करता व सोशल डिस्टन्सींगचे पालन न करता बिनधास्तपणे फिरत असतात. बाजारपेठेतही मास्कचा वापर अभावानेच होतांना दिसत आहे. तर वेळ संपली तरीही दुकाने सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.त्यामुळे नियमांचे पालन करणे आवश्यक बनले आहे.
नपा व पोलीसांची संयुक्त कारवाई प्रभावी ठरेल
कोरोनाच्या काळात शहरात महसुल, नगर परिषद व पोलीस विभाग संयुक्तपणे कारवाई करत असल्याने नियमांचे पालन होत होते. आता पुन्हा मिनी लॉकडाऊन सारखी परिस्थिती आहे. पण बाजारपेठेत फक्त नपाचे अतिक्रमण विरोधी पथक फिरतांना आढळून येत आहे. पोलीसांचे वाहन आले की, पटापट दुकाने बंद होत होती. पोलीसांचा कायदेशीर धाक असल्याने नियमांचे उल्लंघन होत नव्हते. तसेच उपविभागीय अधिकारी,तहसिलदार व त्यांच्या विभागाचे कर्मचारी बाजारपेठेत फेरफटका मारत होते त्यामुळे नपाच्या पथकासही मदत होत होती. आता पोलीस कारवाई व इतर अधिकारी वर्गाचा बाजारात फेरफटका नसल्याने नियमांचे प्रभावी पालन होत नसल्याचे दिसून येत आहे.
नपा कर्मचारी वर्गास पोलीसांच्या मदतीची गरज असल्याची अपेक्षा नपाच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख राधेश्याम अग्रवाल यांनी व्यक्त केली आहे. आता पोलीस येणारच नाहीत या समजातून नागरिक व व्यापारी बांधव बिनधास्त आहेत. यातूनच प्रशासनाच्या आदेशाला दुर्लक्षित करण्याचे प्रकार घडत आहेत. तर महसुल व पोलीस विभागाचा नपाच्या पथकासोबत असहकार तर नाही ना असाही प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे पोलीस विभागाने नपा सोबत संयुक्त कारवाई करावी तरच डेल्टा प्लस आजाराचा संभाव्य धोका टाळता येईल असे सूज्ञ नागरिकांत बोलले जात आहे.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines