अमळनेर - खान्देशचे सुपुत्र शिवाजी लोटन पाटील यांनी दिग्दर्शित केलेला आणि अमळनेर येथील अभिनेते प्रा.विनय जोशी यांना अभिनयाची संधी देणारा राष्ट्रीय पदक विजेता "भोंगा" हा मराठी चित्रपट वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर "झी टॉकीज" या चॅनलवर आज रविवार दि. २९ ऑगस्ट रोजी प्रीमिअर रिलीज होत असून सर्वानाच आवडेल असा अतिशय दर्जेदार हा चित्रपट आहे असे प्रा. विनय जोशी यांनी सांगितले.
सदर चित्रपटात उत्कृष्ठ अभिनयाची झलक दाखविणारे "हलाल" आणि "प्रणय मास्तर" फेम प्रा.विनय जोशी यांनी या चित्रपटाबाबत अधिक माहिती देण्यासाठी अमळनेर येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
काय आहे विषय
भोंगा हा मराठी चित्रपट असून लेकरासाठी भोंगा बंद करणे याचा अर्थ अजान बंद करणे असा होतो का ? या संकल्पेनेवर आधारित हा चित्रपट असून यास कोणताही राजकीय अथवा धार्मिक रंग देण्यात आलेला नाही. चित्रपटाचे निर्माते शिवाजी लोटन पाटील, अरुण हिरामण महाजन,अमोल कागणे आहेत तर शिवाजी लोटन पाटील यांनी दिग्दर्शित केलेला आहे.
हे आहेत कलाकार
या चित्रपटात कपिल गुडसुरकर,श्रीपाद जोशी,दीप्ती धोत्रे,आकाश घरात,पवन वैद्य,सुधाकर बिराजदार,अमोल कागणे,दिलीप डोंबे,अरुण गीते,महेंद्र तिसबे,रमेश भोळे,दीपाली कुलकर्णी आणि अमळनेरचे विनय जोशी यांनी अभिनय केला आहे.कथा-पटकथा शिवाजी लोटन पाटील,निशांत धापसे यांनी लिहीली आहे,डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी रमणी रंजन दास,वीर धवन पाटील तर संगीत विजय गहलेवार आणि गीते सुबोध पवार यांनी लिहीली आहेत.
चित्रपटास मिळाले पुरस्कार
या चित्रपटास २०१९ चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असून हा उत्कृष्ठ मराठी चित्रपट ठरला आहे, याव्यतिरिक्त इंडियन इंटरनेशनल फिल्म फेस्टिव्हल मध्ये बेस्ट फिल्म,पुणे इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल मध्ये बेस्ट मराठी फिल्म तर महाराष्ट्र राज्यात बेस्ट फिल्म,दिग्दर्शन,सामाजिक चित्रपट, कथा आणि फिल्म फेस्टिवल मध्ये बेस्ट फिल्म अॅवार्ड मिळाला आहे असे प्रा. जोशी यांनी सांगितले.
चित्रपट जरूर जरूर पहावा- प्रा.विनय जोशी
प्रा. विनय जोशी म्हणाले की निर्माते दिग्दर्शक शिवाजी पाटील आणि श्री महाजन यांनी दर्जेदार चित्रपटात माझ्या सारख्या खान्देशच्या कलाकाराला अभिनयाची संधी दिल्याबद्दल मी त्यांचा फार आभारी आहे,माझा त्यांच्या सोबत हा तिसरा चित्रपट असून या आधी हलाल आणि प्रणय मास्तर मध्ये त्यांनी मला संधी दिली आहे. खरेतर एवढ्या दर्जेदार चित्रपटाच्या प्रीमियर शो निमित्त मी पत्रकार परिषद घेतोय त्यामुळे याक्षणी मी भावनिक झालो आहे. १९८० पासून नाट्यक्षेत्रात माझा प्रवेश झाला त्यावेळी नाटके करतांना टीकाकार खूप होते मात्र कौतुक करणारेही थोडे असल्याने तेच प्रोत्साहन ठरले,आणि अनेक पारितोषिके प्राप्त केले. शिवाजी सर खान्देशी असल्याने अभिनयाच्या संधीसाठी खूप मागे लागलो. त्यामुळे सुरूवातीला हलाल सिनेमा मिळाला नंतर प्रणय मास्तर व आता भोंगा. प्रत्यक्षात यात भुमिका लहान असली तरी भुमिका लहान किंवा मोठी यापेक्षा संधी मिळाली हे महत्वाचे आहे. तसा प्रणय मास्टर मध्ये महत्त्वाची भूमिका मिळाली आहे. नामांकित अभिनेते प्रसाद ओक,उपेंद्र लिमये यांच्या बरोबर काम करण्याची संधी लाभली,प्रणय मास्तरच्या प्रोड्युसरने चक्क माझ्या अभिनयाचे कौतुक केले होतें,त्यांच्या म्हणण्यानुसार सिनेमा हिट म्हणजे संपुर्ण टीमचे ते श्रेय असते एकटे हिरो काहीच करू शकत नाही.
मौलानाची भुमिका
भोंगा चित्रपटाची सरांनी अमळनेर पासून तयारी केली होती,यात त्यांची मौलानाची भूमिका आहे. आवाजाने त्रास होत असेल तर तुम्ही टाळू शकता,ते सर्व माणसाच्या हातात आहे,सिनेमात राजकारण नसून सामाजिक भान मांडण्याचा प्रयत्न असल्याचे प्रा.जोशी यांनी सांगितले.चित्रपटाचा प्रीमियर शो २९ रोजी रविवारी दुपारी १२ वाजता आणि सायंकाळी ६ वाजता प्रसारित होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आकाशवाणी,रंगभूमी,मोठा पडदा व क्रीडा विश्वातही रमणारा अवलिया
प्रा. विनय जोशी यांनी आधी जळगाव आकाशवाणीत तब्बल २६ वर्ष काम केले असून अनेक वर्षे अभिनयासाठी घेतलेल्या मेहनतीचे हे फळ आहे,अजून बराच प्रवास त्यांचा बाकी आहे. गरुड झेपेची ही खऱ्या अर्थाने सुरुवात आहे,त्यांना आता मोठ्या वेब सिरीज मध्येही मोठा रोल मिळाला आहे,त्यांनी १९८८ साली तमन्ना नावाच्या हिंदी सिनेमात भुमिका केली असून त्या चित्रपटाचे नाव आता "एक छोटीशी भूल" असे आहे,"रंगत संगत" या मराठी चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे सोबत त्यांनी काम केले आहे ,जवळपास ४१ वर्ष सिनेसृष्टीत त्यांना होत असून प्रताप महाविद्यालयात प्राध्यापक असतांना विद्यार्थ्यांची अनेक नाटके बसवून मोठं मोठे अवार्ड त्यांनी मिळवून दिले आहेत.आणि दोन वर्षांपासून निवृत्तीनंतरचा आपला बराचसा वेळ ते अभिनय क्षेत्रासाठी देऊ लागले आहेत.
बासरी वादन,ढोल, हार्मोनियम व माऊथ ऑर्गन वाजविण्याचा छंद त्यांना असून तितक्याच सहजपणे क्रीडा विश्वातही विशेष रूची असणारा हा आगळावेगळा अवलिया माणूस आहे.

