ठाणे मनपाच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे व त्यांच्या सुरक्षा रक्षकावर प्राणघातक हल्ला प्रकरण अमळनेर नपा कर्मचा-यांनी केला निषेध,गुन्हेगारांवर कडक कारवाईची मागणी

--------------------------------------------------------------
                          - * जाहीरात * -
------------------------------------------------------------------
अमळनेर -
ठाणे महानगर पालिकेच्या सहाय्यक आयुक्त, श्रीमती कल्पिता पिंपळे व त्यांचा सुरक्षा रक्षक यांच्यावर प्राणघातक हल्ला प्रकरणाचा येथील नपा कर्मचारी संघटनेने निषेध केला असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.  
कुठे घडली घटना
                  काल दि.३० रोजी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास श्रीमती पिंपळे या  अतिक्रमण विरोधी पथक घेऊन अनाधिकृत हातगाड्यांवर कारवाई करत असतांना तेथील गुन्हेगारी प्रवृत्तीचे हातगाडी फेरीवाले श्री.अमरजीत यादव याने त्यांच्यावर व त्यांचा सुरक्षा रक्षक श्री.सोमनाथ पालवे यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने जीवघेणा हल्ला करून या दोघांनाही गंभीर दुखापत केली आहे. या हल्ल्यात सहाय्यक आयुक्त श्रीमती कल्पिता पिंपळे यांच्या डाव्या हाताची दोन बोटे पुर्णपणे तुटून रस्त्यावर पडली व उजव्या हाताला अंगठ्यासह गंभीर दुखापत झाली आहे. तसेच त्यांच्या डोक्यावर खोल मार लागला आहे. सुरक्षा रक्षक श्री.सोमनाथ पालवे याच्या डाव्या हाताचे एक बोट पुर्णपणे तुटून पडले. या दोघांनाही प्रथमता वेदांत रूग्णालय, ठाणे येथे नेण्यात आले. गंभीर दुखापत व जीवाला असलेला धोका विचारात घेऊन दोघांनाही तात्काळ ज्युपिटर हॉस्पीटल, ठाणे येथे दाखल करण्यात आले. श्रीमती कल्पिता पिंपळे यांच्यावर एकूण तीन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यामध्ये त्यांची तुटलेली दोन्ही बोटे जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर अंगरक्षक श्री.सोमनाथ पालवे यांचे तुटलेले बोट रात्री उशीरा १२ वाजेपर्यंत शोध घेऊनही सापडले नसल्याने त्यांच्या तुटलेल्या बोटावर शस्त्रक्रिया करण्यात आली. झालेला प्रकार अतिशय गंभीर असून निंदनीय आहे.
काय आहे निवेदनात
    अमळनेर नपा कर्मचारी संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,एका महिला अधिकाऱ्यावर अशा प्रकारचा हल्ला होणे ही नक्कीच अत्यंत चिंताजनक बाब असून या बाबीचा सर्व स्तरावरून निषेध होणे आवश्यक आहे. शासनाचे कनिष्ठ अधिकाऱ्यांसाठीचे बदल्यांचे चक्राकार धोरण, पती-पत्नी एकत्रीकरणाला नविन धोरणात दिलेला फाटा व अशा प्रकारे होणारे जीवघेणे हल्ले यामुळे महिला अधिकाऱ्यांच्या मानसिकतेवर काय परिणाम होत असेल ? याचा सुध्दा गांभिर्याने विचार होणे आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही संघटनेच्या या गुन्हेगारी कृत्त्याचा राज्यस्तरीय मुख्याधिकारी संघटना, सर्व राज्य संवर्ग संघटना व सर्व नगर पालिका कर्मचारी संघटना जाहीर निषेध करत आहोत.
              गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जेव्हा कर्तव्य बजावत असणा-या अधिकाऱ्यांवर हल्ले करतात, तेव्हा अशा प्रकारच्या भ्याड हल्ल्याने केवळ हल्ला झालेला अधिकारीच नव्हे तर संपूर्ण प्रशासनाचे मनोधैर्य खच्ची होते. त्यामुळे अशा प्रकारच्या हल्याचा संघटीत निषेध करणे आणि हल्लेखोरांवर कठोर कारवाई करणे हाच यावर योग्य उपाय आहे.  
कारवाईची मागणी
      या निवेदनाद्वारे विनंती करण्यात येते की, प्रस्तूत प्रकरणी अटक केलेल्या गुन्हेगारावर शीघ्र गतीने खटला चालवून कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी शासनाकडून विशेष प्रयत्न व्हावेत अशी मागणी करण्यात आली आहे.
यांची होती उपस्थिती
        सदर निवेदन अमळनेरच्या उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांना देण्यात आले असून यावेळी अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड,नगर अभियंता अमोल भामरे, प्रशांत ठाकूर ,नगरपरिषद संघटनेचे प्रसाद शर्मा, संजय चौधरी, प्रशासन अधिकारी संजय चौधरी व सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.