दुबार - तिबार पेरणीचे ओढवले संकट, चा-या अभावी गुरांचेही हाल
----------------------------------------------------------------
अमळनेर - यंदा पावसाने अमळनेर तालुक्यावर अवकृपा केली आहे. त्यामुळे आधीच कोरोनाने होरपळलेल्या सर्वसामान्य माणसासह शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. तर अजूनही जोरदार पावसाची चिन्हे दिसून येत नाही. भविष्यात भीषण दुष्काळाची चिन्हे दिसून येत आहे. त्यामुळे आतापासूनच सावध होऊन अमळनेर तालुक्यात दुष्काळ जाहीर करून पंचनामे करीत दिलासा द्यावा अशी मागणी माजी आमदार स्मिताताई वाघ यांनी केली आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.काय आहेत मागण्या
जिल्हाधिका-यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अमळनेर तालुका अवर्षण प्रवण क्षेत्रात आहे. गेल्या वर्षी पावसाने कृपा करीत दिलासा दिला होता. पण यंदा तालुक्यात सद्यस्थितित जून व जुलै महिना उलटूनही पुरेसा पाऊस पडला नाही. तर महिन्यात सरासरी पर्जन्यमानात घट झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील दुबार केलेली पेरणी देखील वाया जाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे.
पंचनामे करून शेतकर्यांना पीक विमासह दुष्काळ निधी द्यावा
शेतकर्यांना दुबार तर काही शेतकर्यांना तिबार पेरणीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे त्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. म्हणून तात्काळ तहसीलदार आणि कृषी विभागाला- आदेश देऊन पंचनामे करीत पीक विम्याचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी ही माजी आमदार स्मिताताई वाघ यांनी केली आहे.

